कोकण, रायगड, पालघर भागात मुसळधार, मुंबई-पुण्याबाबत हवामान विभागाची महत्वाची अपडेट

Maharashtra Weather Update : कोकण किनाऱ्यावर दाट मान्सून ढगांचे पट्टे अरबी समुद्रापासून पसरले आहेत. यामुळे गुरुवारी कोकणासह पालघर, रायगड, पुणे, नाशिकच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण, रायगड, पालघर भागात मुसळधार, मुंबई-पुण्याबाबत हवामान विभागाची महत्वाची अपडेट
Mansoon news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2025 | 8:38 AM

Heavy Rain Alert : राज्यातील अनेक भागांत आठवड्याभरापासून पाऊस सक्रीय आहे. मुंबई-पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील पावसासंदर्भात हवामान विभागाने महत्वाची अपडेट दिली आहे. गुरुवारी कोकणच्या काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. रायगड, पालघरमध्ये पावसाचा जोर असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

कोकण किनाऱ्यावर दाट मान्सून ढगांचे पट्टे अरबी समुद्रापासून पसरले आहेत. यामुळे गुरुवारी कोकणासह पालघर, रायगड, पुणे, नाशिकच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरु आहे. गुरुवारी सकाळीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. कल्याण डोंबिवलीसह परिसरातही पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.

पुणे नाशिक महामार्गावर रांगा

आळंदी चाकण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान आज आळंदी येथून होणार आहे. त्यापूर्वीच पावसाने सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली आहे.

रायगडमध्ये शाळांना सुट्टी

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अलिबाग, रोहा ,तळा, महाड पोलादपूर. या तालुक्यांत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज रोजी खबरदारीचा उपाय म्हणून या तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

पुण्यातील धरणांमध्ये साठा वाढला

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 7.40 टीएमसी म्हणजे 25.39 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागीलवर्षी या दिवशी साठा फक्त 3.62 टीएमसी म्हणजे 12.43 टक्के इतका होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

  • खडकवासला 1.28 टीएमसी
  • पानशेत 2.16 टीएमसी
  • वरसगाव 3.67 टीएमसी
  • टेमघर 0.29 टीएमसी

पुण्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास ७१ ठिकाणी राहण्याची सोय

मुसळधार पावसामुळे मुळामुठा नदीला पूर आल्यास नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास त्यांच्या निवासासाठी महापालिकेने शहरात ७१ ठिकाणी सोय केली आहे. गेल्यावर्षी नदीला पूर आल्यानंतर नागरिकांच्या निवासाची गैरसोय झाली होती. त्यामुळे प्रशासनाने यंदा तयारी करून ठेवली आहे. पावसाळ्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष सुरु केले आहेत. हे कक्ष २४ तास सुरू राहणार आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून त्यांना आवश्यक साधनसामग्रीही उपलब्ध करून दिली आहे.