Milind Ekbote : ‘मुस्लिम लव्ह जिहाद करतात, तर जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला..’ मिलिंद एकबोटे यांचं वादग्रस्त वक्तव्य
Milind Ekbote : मिलिंद एकबोटे यांनी हे असं वक्तव्य करण्याची पहिली वेळ नाही. 2018 सालापासून वेगवेगळ्या कारणांमुळे ते चर्चेत आहेत. 2018 साली हिंसाचार प्रकरणात त्यांच्याविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटी आणि दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता.

“जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी बाजीराव-मस्तानी केलं पाहिजे. जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला एक लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देऊ,” असं वक्तव्य मिलिंद एकबोटे यांनी नारायणगाव येथील जाहीर कार्यक्रमात केलं.पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मिलिंद एकबोटे हे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष आहेत. मिलिंद एकबोटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी नारायणगाव येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते मूर्तीस अभिषेक करून शंभू महापूजा करण्यात आली.
मिलिंद एकबोटे यांनी हे असं वक्तव्य करण्याची पहिली वेळ नाही. 2018 सालापासून वेगवेगळ्या कारणांमुळे ते चर्चेत आहेत. 2018 साली हिंसाचार प्रकरणात त्यांच्याविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटी आणि दंगल भडकवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हिंदुत्त्ववादी विचारसरणी मानणारे मिलिंद एकबोटे हे महाराष्ट्र गोसेवा संघाशी सुद्धा जोडलेले आहेत. मागच्यावर्षी पुण्यातच ऑगस्ट महिन्यात त्यांनी एका कार्यक्रमात अजब विधान केलं होतं. “जर्सी गाय ही डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून निर्माण झालेला प्राणी आहे. तसेच या गायीच्या दुधामुळे नपुसंकता निर्माण झाली” असा अजब दावा एकबोटे यांनी केला.
त्यावेळी मिलिंद एकबोटे काय म्हणालेले?
गेल्या वर्षी मिलिंद एकबोटे यांनी या संदर्भातील एक अजब विधान केलं होतं. अर्जेंटिना, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या तीन बड्या देशांमध्ये भारतातील गायींचे संगोपन केले जात आहे. या देशांनी आपल्याच गायींच्या माध्यमातून त्यांच्या देशात मोठा दुग्ध व्यवसाय निर्माण केला आहे. एवढेच नाही तर या तीन देशांनी फक्त भारतीय गायींच्या दुधाच्या विक्रीचा कायदाही केला आहे. म्हणजे या देशात फक्त भारतीय गायींचेच दूध विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. उलट या देशांमध्ये भारतीय जर्सी गायीचे दूध विकले जात नाही. कारण डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून जर्सी गायीची निर्मिती झालेली आहे, असा दावा मिलिंद एकबोटे यांनी केला होता.
मिलिंद एकबोटे यांनी त्यानंतर एक धक्कादायक तर्कही मांडलं आहे. या जर्सी गायीच्या दुधाचे सेवन केल्यावर मधुमेहासारखे आजार होतात. तसेच हे दूध प्राशन केल्याने नपुंसकताही येते, असा अजब दावा करतानाच जर्सी गायीच्या दुधामुळेच पुण्यात टेस्ट ट्युब बेबीचे कारखाने निघाले असून या कारखान्यात लोक रांगा लावून उभे असतात, असा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.