Minakshi Shinde: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची चौकशी; AI ऑडिओ क्लिपपासून राजकीय वैरापर्यंत काय म्हणाल्या?
Pradeep Purnekar Case Minakshi Shinde Inquiry: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची चौकशी करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. माजी महापौर ठाणे मनपा मिनाक्षी शिंदे यांची साडेसात तास चौकशी झाली. एसआयटी प्रमुख अमरसिंह जाधव, तपास अधिकारी शैलेश साळवी, एपीआय कृष्णा गोरे आणि दोन महिला पोलीस अधिकारी यांनी मिनाक्षी शिंदे यांची चौकशी केली आहे. यात त्यांच्यातील चर्चा आता समोर आली आहे. पोलिसांनी कोणते प्रश्न केले, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
चौकशीत तपास अधिकाऱ्यांनी मिनाक्षी शिंदे यांना त्यांचे पूर्ण नाव विचारले असता त्यांनी मिनाक्षी राजेंद्र शिंदे असे सांगितले. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी तुम्ही प्रदीप पुर्णेकर यांना ओळखता का, असा प्रश्न विचारला. त्यावर मिनाक्षी शिंदे यांनी होकार देत, प्रदीप पुर्णेकर हे माझ्याच प्रभागात राहायचे, असे सांगितले. पुढे तपास अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या काळात तुम्ही प्रदीप पुर्णेकर यांना धमकी दिली होती आणि त्यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते, याबाबत विचारले.
यावर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या की, हो, मी त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. ती ऑडिओ क्लिप AIच्या मदतीने बनवण्यात आली होती, असा माझा दावा होता. तपास अधिकाऱ्यांनी पुढे विचारले की, निवडणुकीत प्रदीप पूर्णेकर यांनी तुमच्या विरोधात काम केले होते. त्याचाच राग मनात धरून तुम्ही त्यांची हत्या केली, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मिनाक्षी शिंदे यांनी हा आरोप फेटाळत सांगितले की, निवडणुकीच्या काळात छोटे-मोठे वाद होत असतात. ते वाद त्याच वेळी विसरून जायचे असतात. मी इतकी वर्षे राजकारणात आहे. माझ्या विरोधात अनेकांनी काम केले आहे, मग म्हणून मी सर्वांना विरोध करणार का? पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जे झाले ते चुकीचे होते. मात्र, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राजकारण म्हणून नाहक माझे नाव या प्रकरणात गोवण्यात आले आहे.
यानंतर तपास अधिकाऱ्यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या अनेक व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगितले. या क्लिपमध्ये प्रदीप पूर्णेकर थेट बोलताना दिसतात की, त्यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे जबाबदार असतील. यावर मिनाक्षी शिंदे यांनी उत्तर दिले की, जर ते माझ्याबद्दल असे जाहीरपणे बोलत होते, तर आम्ही त्यांना का मारू? असे केल्यास संशय आमच्यावरच घेतला जाणार, हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे मी किंवा माझ्या कोणत्याही व्यक्तीने ही हत्या केलेली नाही. राजकारण करून मला बदनाम केले जात आहे.
तपास अधिकाऱ्यांनी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली याला तुम्ही ओळखता का, असा प्रश्न विचारला. त्यावर मिनाक्षी शिंदे यांनी होकार देत तो माझा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. यानंतर प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोर संतोष कनोजिया असल्याचे तपासात समोर आल्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या की, हो, मलाही ही बातमी प्रसारमाध्यमांमधूनच कळली. तो माझा कार्यकर्ता आहे, याचा अर्थ मी त्याला हत्या करण्यास सांगितले, असा होत नाही. तसे पुरावे आहेत का? त्याने जे केले, त्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तपासातून खरे-खोटे समोर येईल.
शेवटी तपास अधिकाऱ्यांनी मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावरही प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा आरोप करण्यात आल्याबाबत प्रश्न विचारला. यावर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या की, त्यांची आठ वेळा चौकशी आपणच केली आहे. आपल्याला लक्षात आले असेल की कोणी काय केले आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
मिनाक्षी शिंदे म्हणाल्या की, माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका तीच आहे. पोलिसांनी जेव्हा बोलवतील तेव्हा चौकशीसाठी मी हजर राहीन. त्या प्रकारे मी पोलिसांना सहकार्य केलेलं आहे, त्यांनी बोलावल्यानंतर येऊन चौकशीला सामोरे गेले. पुन्हा चौकशीला बोलावलं आहे. अजून तर कल्पना नाही, ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी मी नक्की येईन. माझ्यासोबत फोटो आहेत त्याबद्दल प्रभागात राहणाऱ्या लोकांचे फोटो माझ्यासोबत असणारच आहेत.
त्या म्हणाल्या की, एका भागात राहतात तर ओळखणारच ना, मी हे मागे पण तुम्हाला क्लियर केलं होतं. हे पोलीस चौकशीचा भाग आहे. सगळ्याच गोष्टी जर मीडियासमोर एक्सपोज करायला लागले तर मग उपयोग काय? त्याला अर्थच राहत नाही. पोलिसांची चौकशी चालू आहे, त्या गोष्टी मी इथे समोर बोलायला लागले तर त्याला काय अर्थ राहील? लहानातला लहान मुलगा पण सांगू शकतो की पाखरं हाकलण्यासाठी गावामध्ये तशा बंदुका असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये असतात त्याच्यावरती जर ते अडचण करत असतील तर त्याला मी काय उत्तर देऊ. पोलीस तपास करतील.पोलीसांवर अविश्वास दाखवायचा नाही. 4 तास की 5 तास की 7 तास चौकशी चालली या बद्दल मला काहीही म्हणायचे नाही, अशी प्रतिक्रिया मिनाक्षी शिंदेंनी दिली आहे.