वातावरण तापलं, बावनकुळे जरांगे पाटलांवर एवढे का संतापले?

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर त्याला आता बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

वातावरण तापलं, बावनकुळे जरांगे पाटलांवर एवढे का संतापले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2025 | 4:12 PM

मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे,  मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार होतं, मात्र त्यापूर्वीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे हाय कोर्टानं मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे.  त्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

अखेर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत, आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल, आमच्या वकील बांधवांची टीम आहे ते कोर्टात जातील असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान आंदोलन आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता, यावर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

सरकार उलथून टाकण्याची ती जे भाषा करतात ती अयोग्य आहे, कारण देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं महायुती सरकार लोकांनी तीन कोटी सतरा लाख मतांनी निवडून दिलेलं आहे. 51.78 टक्के मतानं हे सरकार निवडून आलेलं आहे, आणि अशा सरकारला उलथून टाकू? तीन कोटी सतरा लाख मत मिळाले आहेत, ही जी भाषा आहेना ती महाराष्ट्रात तेढ निर्माण करणारी भाषा आहे. माझी विनंती आहे, सर्वांनाच महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषा करू नये. कोणी कोणाला चिथावणी देऊ नये, असं यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आपला हक्क सर्वांना मांडता येईल, राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा तर मराठा आरक्षण या राज्यात आणण्याचं कामच देवेद्र फडणवीस यांनी केलं आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचं आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करण्याचं काम  केलं आहे. मी स्वत: बघितलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी सात -आठ रात्री जागून मराठा आरक्षणाचा कायदा केला होता, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.