मिरजमध्ये मोठी दुर्घटना, सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळला, 6 जण अडकले
मिरज सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचं काम सुरू असताना एक दुर्घटना घडली. सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळून सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

मिरजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मिरज सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराचं काम सुरू असताना एक दुर्घटना घडली. सिव्हिल हॉस्पिटलबाहेर स्लॅब कोसळून सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात येणारी नवीन कमान अचनाक कोसळली. कमानीचा स्लॅब कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्दैवी अपघातामुळे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 7 जण जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.
अचानक कोसळला स्लॅब
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजनधील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्यात येत होती. त्याच कमानीचं काम सुरू होतं. मात्र स्लॅब टाकत असताना थोडयावेळापूर्वी अचानक तो स्लॅब खाली कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. त्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले, काही जखमी झाले. त्यांना बाहेर काढण्याचं बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी 6 ते 7 जणांना बाहेर काढण्यात यश आलं. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतयं. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीने स्लॅबचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी मोठी गर्दी असून पोलिसांसह रुग्णालय प्रशासन ही दाखल झालं आहे.
बातमी अपडेट होत आहे.