शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार? शिंदे, पवार भेटीवर बड्या नेत्याचं मोठं विधान

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार? शिंदे, पवार भेटीवर बड्या नेत्याचं मोठं विधान
Sharad Pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 12, 2026 | 9:29 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे. ‘ही भेट अचानक झाली मात्र शेवटी पवार साहेबही एकनाथ शिंदे यांच्याकडे का गेले? याबद्दल अनेक शंका आहेत. पवार साहेब त्यांच्याकडे का गेले? आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे म्हणून पवार साहेब गेले का? एनडीएला समर्थन द्यायचा आहे का? अशा शंका आहेत. जर शरद पवार यांना महायुतीमध्ये यायचं असेल तर त्यांना  केंद्रीय नेतृत्व आणि केंद्रीय पक्ष यांच्यासोबत चर्चा करावी लागेल.

2014 ला एनडीएमध्ये जाण्यासाठी समर्थन दिलं त्यावेळी काय झालं ?  2017 मध्ये एनडीएत जाण्यासाठी शरद पवार यांनी चर्चा केली त्यावेळी काय झालं? यासंदर्भात एनडीए मधले घटक पक्ष विचार करत असतील. समर्थन घेणाऱ्याला आणि समर्थन देणाऱ्याला याबाबत माहिती असेल, आम्हाला मात्र जो येत असेल त्याचा स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया या भेटीवर अनिल पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रतिक्रिया 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत, अशी देखील चर्चा सुरू आहे. यावर देखील पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी  एकत्र आले पाहिजेत हा निर्णय कार्यकर्ता घेणार नाही. हा निर्णय पवार कुटुंबीयांना घ्यायचा आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता हा पवार कुटुंबीयांवर प्रेम करतो, त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम राहील, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसेंवर प्रतिक्रिया

दरम्यान अमित शाह यांनी मला भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निमंत्रण दिलं आहे, असा दावा खडसे यांनी केला होता, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.  एकनाथ खडसे  भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, या चर्चा मी गेल्या चार ते पाच वर्षापासून ऐकतो आहे. एकनाथ खडसे हे पद मिळवण्याकरताच केवळ राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आले होते, आणि आता पुढच्या पिढ्यांची सोय करायची असेल याकरिता ते भाजपमध्ये जाऊ शकतात, असा खोचक टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

.

Follow Us