
शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेत्यांकडून आपल्याला सातत्याने पक्षात येऊन विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर मिळत होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले उपकार मी आयुष्यात विसरू शकत नाही, त्यामुळे मी त्यांना कधीही सोडणार नाही, असे स्पष्ट मत निलेश राणे यांनी मांडले.
निलेश राणे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी एका तिकीट वाटपाच्या प्रसंगाचा उल्लेख केला. मी तुमच्याकडून तिकीट मागत होतो. तुम्ही मला दिले नाही. एका घरात तीन तिकीट कसे देणार? असं तुम्हीच बोललात. मी देवेंद्र फडणवीसांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो. मी जाऊ का असंही विचारले. त्यांनी ‘हो’ म्हणून सांगितले, असा एक किस्सा निलेश राणेंनी सांगितला.
निलेश राणे यांनी यावेळी काही भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. मी प्रामाणिकपणे काम करतोय. शिवसेना ठाकरे गटातील लोकांना सहभागी करून घेतोय. भाजप नेत्यांना त्याचा त्रास होतोय. तू यांना का घेतोय? तुला तर भाजपमध्ये यायचं आहे. तर त्यांनी तू का घेतोय असं विचारलं. मी ‘येणार नाही, घरी बसेन,’ असे सांगितले. मला काहीही बनायचं नाही. मला उद्याची निवडणूक जरी लढायला मिळाली नाही, जर एकनाथ शिंदे म्हणाले घरी बस, तर मी घरी बसणार.” असे निलेश राणे म्हणाले.
मी निवडून आल्यानंतर आपल्याला सातत्याने ऑफर येत होत्या, असा दावा निलेश राणे यांनी केला. निवडून आल्यानंतर मग ऑफर सुरू होते. निलेश तुला नंतर भाजपमधूनच निवडणूक लढवायची ना. तू लोकसभा, विधानसभा ही भाजपमधूनच लढवशील. हे आतापर्यंत होत होतं. त्यानंतर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी कधीच एकनाथ शिंदेंना सोडणार नाही, असे निलेश राणेंनी स्पष्टपणे सांगितले.
एकनाथ शिंदेंनी माझ्यावर जे उपकार केलेत, ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. जर मी एकनाथ शिंदेंना सोडलं, तर मला देव माफ करणार नाही. मग मला राजकारणात काही नाही मिळालं तरी चालेल. मला कोणत्याही मंत्रिपदासाठी, मोठ्या पदात अजिबात रस नाही, असेही निलेश राणे म्हणाले. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच युतीमधील अंतर्गत संबंधांवरही सध्या चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.