आमदार रोहित पवार यांचे गंभीर आरोप, पुण्यातील आंदोलनात मोठा पोलिस बंदोबस्त, हायकोर्टात..
आमदार रोहित पवार गेल्या 7 दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यातच या आंदोलनाविरोधात काही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. यादरम्यान रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केली आहेत.

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी रोहित पवार लढा देत आहेत. गेल्या सात दिवसांपासून ते विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसले आहेत. आंदोलन मोडण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचे मोठे विधान रोहित पवार यांनी केले. त्यातच रोहित पवार यांचे ट्विटर (आता एक्स) खाते सस्पेंड करण्यात आले आहे. त्यामुळे आता विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे सरकारचे धोरण पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी आपली भूमिका फेसबुकवर पोस्ट केली आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनाविरोधात पुणेकरांनी थेट कोर्टात धाव घेतली. आता रोहित पवार यांच्या आंदोलनाजवळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे. रोहित पवार आंदोलन ठिकाणी रस्त्यावरच झोपले होते. आंदोलन विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.
नुकताच रोहित पवार यांनी म्हटले की, आमच्याकडे तीन पर्याय होते. आम्हाला या गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा होता. म्हणून आंदोलन करायचेच होते. पण आम्ही अलका चाैकसारखा पर्याय का निवडला नाही, याचे कारण म्हणजे आम्हाला माहिती होते की, विद्यार्थी इतक्या मोठ्या संख्येने जमतील. पुणेकरांना त्याचा खूप मोठा त्रास झाला असता. म्हणून आम्ही एस.एम जोशी मार्गावर टिळक भवनाजवळ बसलो.
कारण या मार्गाच्या दोन्ही बाजूला पर्यायी मार्ग आहेत. आम्ही जिथे बसलो तिथे स्मशानभूमी आहे. या भागात तशी वर्दळ फार नाही. पण तरी सुद्धा काही याचिकाकर्ते हायकोर्टात गेले. त्यापैकी असलेला एक याचिकाकर्ता हा महापालिकेतील भाजपाचा प्रमुख नेता आहे, त्याचा तो कार्यकर्ता आहे. जो त्या नेत्याचे अर्थकारण बघतो. त्याच्या मशिन आहेत, तो महानगरपालिकेचे काम घेतो. तो बिल्डिंगची कामेही करत असतो. तो भाजपाचा कार्यकर्ता आहे हे सिद्ध झाले.
काल पोलिस प्रशासनापैकी पदावरील उच्च व्यक्ती आणि तो कार्यकर्ता भेटल्याचे कळते. आम्ही मागणी करतो की, सीडीआर काढा. कुठला पोलिस अधिकारी त्या याचिकाकर्त्याला भेटला. ते आम्हाला सांगा. आता कोर्टात काय निर्णय होणार हे पोलिसांना अगोदरच कळाले. सहा दिवसांमध्ये जेवढे पोलिस नव्हते तेवढे पोलिस आता इथे जमले आहेत. त्याचा अर्थ पोलिसांना कळाले आहे की, कोर्ट काय निर्णय देणार आहे. इथल्या विद्यार्थ्यांना उचलण्यासाठी पोलिस आलेत. याचिकाकर्ता हा भाजपाचाच कार्यकर्ता आहे.