Rohit Pawar : ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आला, आता..रोहित पवारांची सभागृहात पाऊल ठेवण्याआधी मोठी मागणी

Rohit Pawar : "अजितदादा आज नाहीत. त्यामुळे अधिवेशनात काय बोलावं ते कळत नाही. एवढा मोठा नेता आपल्यात नाहीये. ही वेदना आहे. अजितदादांनी ११ वेळा अर्थ संकल्प मांडला आहे"

Rohit Pawar : ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आला, आता..रोहित पवारांची सभागृहात पाऊल ठेवण्याआधी मोठी मागणी
Rohit Pawar
| Updated on: Feb 23, 2026 | 11:51 AM

“काल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आमचे कोणीच येणार नव्हते, कारण काही कामं होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना यासंदर्भात कळवलं होतं. अजित पवार यांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. पायलट वर का शंका घेतली पाहिजे? यासंदर्भातील सगळे पुरावे मी माझ्या पत्रकार परिषदेत मी दिले आहेत” असं आमदार रोहित पवार म्हणाले. आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी शोक प्रस्ताव सभागृहात मांडला जाईल. त्याआधी सभागृहाबाहेर रोहित पवार मीडियाशी बोलले. “सगळे पुरावे तपास यंत्रणा योग्य पद्धतीने गोळा करत आहेत का?. दादांच्या अपघाताची सखोल चौकशी ही झाली पाहिजे” या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

“काय प्रकारचा तपास हा तपास यंत्रणा करत आहेत. यासंदर्भात आम्ही बघू. व्हीएसआर वर काय कारवाई केली जाणार? यासंदर्भात आम्ही बघू. त्यांनी अनेक नियमांचं उल्लंघन केलं आहे. मुख्यमंत्र्यांना मी या अपघाताच्या संदर्भात पत्र देणार आहे आणि या पत्रात मी या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी आणि लवकरात लवकर रिपोर्ट हा समोर आला पाहिजे अशी मागणी केली आहे” असं रोहित पवार म्हणाले.

अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार काय बोलले?

“ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आला आहे. श्वेता सिंग विषयीची देखील माहिती समोर आली आहे. अधिवेशनात सर्वात आधी येणारे अजितदादा असायचे. सर्वात शेवटी जाणारेही अजितदादा असायचे. मी जेव्हा मीडियाशी संवाद साधत असताना अजितदादा जात असतील तर मला टोमणे मारायचे” अशी आठवण रोहित पवार यांनी सांगितली.

अजितदादांनी ११ वेळा अर्थ संकल्प मांडला

“अजितदादा आज नाहीत. त्यामुळे अधिवेशनात काय बोलावं ते कळत नाही. एवढा मोठा नेता आपल्यात नाहीये. ही वेदना आहे. अजितदादांनी ११ वेळा अर्थ संकल्प मांडला आहे. दादा असते तर महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा बजेट मांडणारे अर्थमंत्री अजितदादा असते. १९८२ पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. कारखान्याचे डायरेक्टर ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंत ते गेले. ते असते तर राज्यातील सर्वोच्च पद मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं असतं” असं रोहित पवार यांनी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मी पत्र देणार आहे. नायडू यांना पदावर ठेवणं योग्य नाही. रिपोर्टमध्ये डिटेल्स असावेत. थातूरमातूर उत्तर नसावं” असं रोहित पवार म्हणाले.

Follow Us