मोठी बातमी ! गोंदिया, अकोला आणि बुलढाण्यात काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार… नगरसेवक फुटले; महाराष्ट्रात खळबळ

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गोंदिया, अकोला आणि बुलढाण्यात काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला, तर हिंगोलीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहेत. हे नगरसेवक भाजप आणि शिंदे सेनेत सामील झाल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी ! गोंदिया, अकोला आणि बुलढाण्यात काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार... नगरसेवक फुटले; महाराष्ट्रात खळबळ
काँग्रेसला मोठं खिंडार
| Updated on: Jun 16, 2026 | 1:53 PM

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत आहे. तसेच मतांची बेगमी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगरसेवकांना आपल्यासोबत घेण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरू आहेत. त्यात मात्र महायुतीला यश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया, अकोला आणि बुलढाण्यात काँग्रेसला खिंडार पडलं आहे. तर हिंगोलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. या ठिकाणचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपला मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गोंदियात जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक फुटणार

सध्या गोंदिया/भंडारा विधान परिषदेचे वारे वाहत आहेत. यामध्ये अनेक पक्षाचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील काँग्रेसचे एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन नगरसेवक हे भाजपाच्या गळाला लागले असल्याची विश्वासने सूत्राची माहिती आहे. आणि हे तिघेही भाजपा नगरसेवकांसोबत सहलीला गेले असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे गोंदिया- भंडाऱ्यात खळबळ उडाली आहे.

अकोल्यात खेला

अकोल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही पक्षांच्या मिळून 10 नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपंचायतमधील 4 काँग्रेसचे, 2 अजितदादा गटाचे आणि 4 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. तर शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या पुढाकारांने सर्वांचा काल मुंबईतील नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश पार पडला.

पवार गटाचे नगरसेवक नॉट रिचेबल

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगणा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सहा नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी नागपूरमधून महाविकास आघाडीकडून अतुल लोंढे हे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत. तर महायुतीकडून भाजपचे राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

बुलढाण्यात मोठी उलथापालथ

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरच्या राजकारणात मोठा राजकीय स्फोट झाला आहे.. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे नगरपालिकेत महाविकास आघाडीचे संख्याबळ आता 7 वरून 16 वर पोहोचले आहे, दरम्यान, महाविकास आघाडीकडे आता स्पष्ट बहुमत तयार झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेतील विरोधी पक्ष शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेस नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मेहकर नगरपालिका निवडणूक झाली त्यावेळी दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळी लढली होती. यावेळी ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नगराध्यक्ष पद मिळविले होते 7 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी काँग्रेसला 11 नगरसेवक तर शिंदेसेनेला 9 नगरसेवक मिळाले होते. नगर पालिकेत सत्ता स्थापनेवेळी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे यांनी एकत्र येत आपला गट तयार करून उपाध्यक्ष, समित्या आपल्याकडे ठेवल्या होत्या.

मात्र आता सहा महिन्याच्या नंतर शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेसचा गट फुटून नगरपालिका उपाध्यक्षासह 9 नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मेहकरचे आमदार ठाकरे गटाचे, नगर पालिका ठाकरे गटाकडे, यामुळे मेहकरमध्ये ठाकरे यांच्या शिवनेचे वर्चस्व पहायला मिळत आहे. या घडामोडींमुळे मात्र मेहकरची चर्चा जिल्ह्यासह राज्यात होऊ लागली आहे. कारण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे मेहकर होम टाऊन असून त्यांचाच आमदार तीन वेळा निवडून आलेला आहे.

Follow Us