Raj Thackrey : अशा प्रकारे लढवण्यापेक्षा, निवडणूका न लढवलेल्याच बऱ्या – राज ठाकरे संतापले

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर त्यावर मोजकी प्रतिक्रिया व्यक्त करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पहिल्यांदाच या मुदयावरून स्पष्ट बोलले. विधानसभेचा निकाल न पटल्याचे सांगत त्यांनी त्यावर स्पष्टपणे मत मांडलं.

Raj Thackrey : अशा प्रकारे लढवण्यापेक्षा, निवडणूका न लढवलेल्याच बऱ्या - राज ठाकरे संतापले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
| Updated on: Jan 30, 2025 | 1:11 PM

विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर त्यावर मोजकी प्रतिक्रिया व्यक्त करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पहिल्यांदाच या मुदयावरून स्पष्ट बोलले. विधानसभेचा निकाल न पटल्याचे सांगत त्यांनी त्यावर स्पष्टपणे मत मांडलं. ” महाराष्ट्रात निकाल लागल्यावर पहिल्यांदा सन्नाटा पसरला. ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला हवा होता, मिरवणुका काय सगळं… सन्नाटा. कारण लोकांमध्येच संभ्रम होता. असा कसा निकाल लागला ? भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो, पण अजित पवार ४२ जागा ? ४ ते ५ जागा येतील की नाही असे वाटणाऱ्यांना ४२ जागा ? आणि ज्यांच्या जीवावर यांनी राजकारण केल त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? ” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वरळी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

लोकसभेला काँग्रेसचे 13 खासदार जिंकले त्या खासदारांच्या खाली ४ ते ५ आमदार असतात त्यांचे १५ आमदार आले ? शरद पवार यांचे ८ खासदार आहेत त्यांचे इतके कमी आमदार ? चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात? काय झालं कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे, असे राज ठाकरे म्हणाले.   या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलय फक्त ते आपल्यापर्यंत आलेल नाही हे लक्षात घ्या. अश्या प्रकारच्या जर निवडणूका होत असतील तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्वेग व्यक्त केला.

पक्षाने तुम्हाला आजपर्यंत ज्या गोष्टी दिल्या. सांगितल्या, केल्या. जी आंदोलने केली, ज्याचे निर्णय लागले. त्या गोष्टी तुम्ही सतत लोकांसमोर मांडत राहिले पाहिजे. आतापर्यंत आपण काय काय केलं. कोणती आंदोलने केली. कोणत्या विषयात हात घातला. त्यात काय निर्णय आला. त्यात तुम्ही कन्व्हिन्स पाहिजे. लोकांनी प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणं योग्य नाही, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.

मी स्वार्थासाठी भूमिका बदलली नाही 

राज ठाकरे भूमिका बदलतात, असं नेहमी म्हटलं जातं.  मी पदाधिकाऱ्यांशी बोललो, भूमिका बदलणं कशाला म्हणतात. हे तुम्हाला माहीत आहे का. राज्यात लोकांनी कशा भूमिका बदलल्या आणि आपण काय केलं हे सांगतो,  असं म्हणत राज ठाकरेंनी सर्व इतिहासच उकरून काढला. सर्वांनी आपल्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्या. मी कोणत्या भूमिका बदलल्या? आता जर तुम्ही मंत्रिमंडळातील लोकं बघितली तर बहुतेक शिवसेना आणि काँग्रेसचे आहेत. त्यांचं सरकार आहे. त्यांना विचारणार नाही. पण तुमच्या कानात हे ऐकवणार की भूमिका बदलली, भूमिका बदलली, असे म्हणत राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.