
महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, कल्याण-डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी शहरातील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आज डोंबिवलीत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, आणि बदलापूर येथील मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मनसे नेते राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अनेक सूचना करण्यात आल्या. त्यासोबतच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत लवकरच अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल आणि पदांमध्ये अदलाबदल केली जाणार असल्याचे संकेतही मनसे नेत्यांकडून देण्यात आले आहेत. तसेच या बैठकीदरम्यान डोंबिवलीत मनसेची महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यात आली आहे.
महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे. याच अनुषंगाने, मनसेने कल्याण-डोंबिवली परिसरात आपली पकड मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज डोंबिवली येथे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या पाच शहरांतील मनसे पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे ज्येष्ठ नेते राजू पाटील आणि मनसे नेते तथा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचा मुख्य उद्देश आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीचा आढावा घेणे हा होता. या बैठकीला जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, विभाग अध्यक्ष यांसारख्या प्रमुख पदांवरील पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकांसाठीच्या कामकाजाचा आणि पदाधिकाऱ्यांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या तसेच पदांमध्ये अदलाबदल करण्याचे संकेतही मनसे नेत्यांनी दिले आहेत.
यावेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी केंद्रीय समितीने नियुक्त केलेल्या वेगवेगळ्या विभाग अध्यक्ष गटांची बैठक होती. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली अशा पाच शहरांची ही आढावा बैठक होती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कसे काम करायचे, नियुक्त्या कशा करायच्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. येत्या काही दिवसांत काही महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात. विशेषतः मुंबई आणि ठाण्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण आहे. इतर पक्षांप्रमाणेच आम्हीही कामाला लागलो आहोत.” असे राजू पाटील यांनी सांगितले.
यावेळी राजू पाटील यांनी सुमित कंपनीला दिलेल्या कचरा व्यवस्थापन ठेकेदारीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, मुंबईतील डीप क्लीन चा ठेका सुमित कंपनीला दिला आहे. त्यासोबतच कचऱ्याच्या गाड्यांचा टेंडरही त्यांच्याकडेच आहे. कल्याण-डोंबिवलीत कचऱ्यातून पैसे कसे कमवायचे आणि ते कसे खातात, कल्याण डोंबिवलीतला कचरा सेट कोण हे यापूर्वीच्या ठेकेदारांना चांगलेच माहिती आहे, असा आरोप राजू पाटील यांनी केला आहे.
त्यासोबतच राजू पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महानगरपालिकेची उद्याची शाश्वती नसताना, प्रशासक बसल्यामुळे सुमित कंपनीला दहा वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. सध्या हा ठेका साडेआठशे-नऊशे कोटींचा आहे आणि तो नंतर वाढणार देखील आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ठेका देऊनही ही कंपनी पालिकेच्या गाड्या वापरते. त्यामुळे कचऱ्यातून पैसे खाणारे कचरा सेठ कोण आहेत, हे पूर्ण महानगरपालिका आणि सर्वसामान्य नागरिकांना माहिती आहे,” असा गंभीर आरोप राजू पाटील यांनी केला. या ठेकेदारीबाबत मनसेने माहिती मागवली असून येत्या दोन ते तीन दिवसांत आयुक्तांची भेट घेऊन याचा जाब विचारणार आहे. यात काही गोलमाल आढळल्यास नागरिकांचे पैसे यात वापरू देणार नाही. जो नागरिकांवर कर लावला आहे, तोही लवकरच रद्द करण्याची मागणी करणार आहोत,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.