
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानतंर आता सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांची तयारी केली जात आहे. सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकला चलो रे चा नारा दिला होता. त्यानंतर भाजपनेही महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले होते. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिका निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षवाढीबद्दल पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी शिवतीर्थावर बैठक बोलवली होती. या बैठकीत मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीबद्दल महत्त्वाच्या सूचना दिल्या. या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमची पक्षवाढीसाठी बैठक झाली. यावेळी संघटनात्मक पातळीवर चर्चा झाली, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
“दिल्लीची परिस्थिती ही वेगळी आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे निकाल लागले आणि सहा महिन्यांनी हे निकाल बदलले गेले. त्याच्यावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक संस्थांकडूनही यावर शंका उपस्थित करण्यात आली आहे. यात पारदर्शकता आली पाहिजे, असे मला वाटते”, असे संदीप देशपांडे म्हणाले.
“विरोधकांमध्ये एकी नसल्याने त्याचा परिणाम हा दिल्लीच्या निकालावर दिसला. आप आणि काँग्रेस जर एकत्र लढले असते तर कदाचित दिल्लीचे चित्र थोडे वेगळे दिसलं असतं”, असे संदीप देशपांडेंनी म्हटले.
“अजित पवारांचाही मुलगा निवडून आला नव्हता. पवार साहेबांच्या पत्नीदेखील निवडून आल्या नव्हत्या. आम्ही जी काही निवडणूक लढवली आणि आम्हाला जी काही मत मिळाली ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपचा पदर पकडला किंवा मोदींचे नाव घेतले म्हणून आम्हाला ही मत मिळालेली नाहीत. अजित पवारांना जी मत मिळाली आहेत, ती भाजपसोबत लग्नगाठ बांधली म्हणून ती मिळाले. त्यांनी एकट्याच्या जीवावर उभं राहवं आणि मग या वल्गना कराव्यात”, असा टोलाही संदीप देशपांडेंनी लगावला.