मोठी बातमी | ‘राज्यात आणखी एक सुशांतसिंह राजपूत प्रकरण; जितेंद्र आव्हाडांचा बॉडीगार्ड वैभव कदमला कुणी मारलं?’ मोहित कंबोज यांचा सवाल

जितेंद्र आव्हाड यांच्या तत्कालीन बॉडीगार्डचा मृत्यू म्हणजे राज्यातील आणखी एक सुशांतसिंग राजपूत प्रकरण आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलाय

मोठी बातमी | राज्यात आणखी एक सुशांतसिंह राजपूत प्रकरण; जितेंद्र आव्हाडांचा बॉडीगार्ड वैभव कदमला कुणी मारलं? मोहित कंबोज यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2023 | 3:18 PM

गोविंद ठाकूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम (Vaibhav Kadam) यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे ठाणे आणि मुंबईत खळबळ माजली आहे. आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी या प्रकरणात मोठा दावा केला आहे. राज्यातलं हे आणखी एक सुशांतसिंह राजपूत आणि मनसुख हिरेन सारखं प्रकरण असल्याचा दावा त्यांनी केलाय. वैभव कदम हे अनंत करमुसे प्रकरणात आधी आरोपी होते तर आता ते माफीचे साक्षीदार बनणार होते. या घडामोडींमध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू होणं अत्यंत गंभीर आहे. एका हायप्रोफाइल प्रकरणातल्या साक्षीदाराच्या मृत्यूची तत्काळ दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाण्यातील तत्कालीन अभियंता अनंत करमुसे यांनी समाज माध्यमांवर जितेंद्र आव्हाड यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या रागातून करमुसे यांना आव्हाड कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी त्यांच्या घरातून उचलून आव्हाड यांच्या बंगल्यावर आणले होते. पोलीस कॉन्स्टेबल वैभव कदम हे तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड होते.

ही मारहाण आव्हाड यांच्या सांगण्यावरून झाली होती. या प्रकरणात वैभव कदम यांच्यासह सागर मोरे आणि सुरेश जनाटे या पोलिसांनाही अटक झाली होती. मात्र आता वैभव कदम यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे खळबळ माजली आहे.

वैभव कदम यांचा घातपात?

कॉन्स्टेबल वैभव कदम यांचा मृतदेह २९ मार्च रोजी ठाण्यातील निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वेमार्गावर आढळून आला. ही आत्महत्या आहे की घातपात यावरून संशय व्यक्त केला जातोय. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या कदम यांचा मृचदेह पोस्टमॉर्टेमसाठी नेण्यात आला आहे.

मोहित कंबोज यांची मागणी काय?

करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदमचै मृतदेह सापडला आहे. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपुत सारख प्रकरण झाल्याचा मोहित कंबोज यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घारून तात्काळ FIR दाखल करावा, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.