मान्सूनचा पाऊस कहर करणार, या जिल्ह्यांना अलर्ट जारी; तुमच्या भागात कधी बसरणार? वाचा तारीख

Maharashtra Rain Alert : कोकणाच्या काही भागात मान्सूनचा पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. मात्र मान्सूनने अद्याप हवा तसा जोर पकडलेला नाही, आता आगामी काळात राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा पाऊस कहर करणार, या जिल्ह्यांना अलर्ट जारी; तुमच्या भागात कधी बसरणार? वाचा तारीख
Monsoon Heavy Rain Alert In Maharashtra
Image Credit source: Google
| Updated on: Jun 09, 2026 | 9:46 PM

गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेर राज्यात दाखल झाला आहे. कोकणाच्या काही भागात मान्सूनचा पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. मात्र मान्सूनने अद्याप हवा तसा जोर पकडलेला नाही, त्यामुळे राज्याच्या इतर भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र आता मान्सूनबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. पुढील दोन दिवसात मान्सून राज्याच्या इतर भागात दाखल होणार आहे. सध्या मॉन्सून हा दाक्षिण कोकण आणि सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात दाखल असून तो आगामी काळात उर्वरित महाराष्ट्रात मार्गक्रमण करणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोणत्या जिल्ह्यात कधी पावसाची शक्यता?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लेट झालेला मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात राज्याच्या काही भागात दाखल होणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 10 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 11 जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात 10 जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर अहिल्यानगरमध्ये 12 जून रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा येलो अलर्ट जारी

खान्देशातील जळगाव, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये 11 ते 18 जून, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये 12 ते 15 जून या कालावधीत पावसाची शक्यता आहे. विदर्भातील नागपूरसह आसपासच्या परिसरात 15 आणि 16 जूनला पावसाची शक्यता आहे. वरील सर्व जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून सगळीकडे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये उष्णतेचा आणि पालघरमध्ये उष्णतेचा आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत रिमझिम पावसाच्या सरी

मुंबईत आज पावसाला सुरुवात झाली आहे. फोर्ट परिसरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ पहायला मिळाली. या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पावसामुळे उकाड्यापासून मुबंईकरांना दिलासा मिळाला आहे. आता पुढील काही दिवसात मुंबईत मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Follow Us