
डोंबिवलीचे शास्त्रीनगर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात एका 26 वर्षीय गर्भवती महिलेच्या मृत्यू झाल्यामुळे संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. डॉक्टरांनी त्यांच्या परवानगीशिवाय गर्भाशयाच्या पिशवीचे ऑपरेशन करून महिलेला गंभीर परिस्थितीत ढकलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, महिलेचा जीव वाचवण्यासाठी गर्भाशयाची पिशवी काढल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
डोंबिवलीतील रहिवाशी अविनाश सरोदे यांच्या 26 वर्षीय पत्नी सुवर्णा सरोदे यांना 11 तारखेला डिलिव्हरीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 तारखेला त्यांना प्रसूतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. जिथे त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, डिलिव्हरीनंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांनी त्यानंतर तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेले आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने तिचे गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यात आला असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या महिलेचे प्राण वाचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. सिझेरियन नंतर महिलेचा रक्तदाब वाढून तिची तब्येत ढासळल्याने तिच्यावर पुन्हा सर्जरी करण्यात आली, त्यात तिचे गर्भाशय काढण्यात आले. त्यानंतर तिला वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. गर्भाशय काढण्याचा निर्णय तिचा जीव वाचवण्यासाठी घेण्यात आला असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
या घटनेनंतर महिला रुग्णाच्या कुटुंबीयांनी शास्रीनगर रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. जवळपास तासभर रुग्णालयातील वातावरण त्यामुळे तणावपूर्ण राहिले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, गर्भाशय काढण्यापूर्वी आमची परवानगी घेतली नाही असा आरोप महिला रुग्णाच्या पतीने केला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुवर्णाचा मृत्यू झाला आहे. सिझेरियन नंतर रक्तस्त्राव वाढल्याने सुवर्णाला वाचवण्यासाठी तिचे गर्भाशय काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. डॉक्टरांनी तिचा जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तिचे प्राण वाचवण्यात अपयश आले. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आरोप निराधार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुवर्णा हिच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कुटुंबियांनी दिला आहे. या घटनेने कल्याण-डोंबिवलीत आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मात्र एकीकडे स्मार्ट सिटीच्या मोठमोठ्या घोषणा करणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका किमान चांगल्या आरोग्याच्या सुविधा नागरिकांना पुरवू शकत नाही अशी खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.