
प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : छत्रपती संभाजीनगरच्या एका बड्या हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रे देऊन एक महिला तब्बल सहा महिने वास्तव्यास होती. हैराण करणारे म्हणजे या महिलेचे थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संबंंध होते. ही महिला आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगत. या महिलेवर अत्यंत गंभीर आरोप असून तिच्याकडे धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत. कल्पना भागवत या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली. तिची कसून चाैकशी केली जात आहे. तिच्याजवळ आणि तिच्या मोबाईलमधून हैराण करणारी माहिती पुढे आली. मोठं रॅकेट उघडकीस आलंय. हेच नाही तर ही महिला अनेकांकडून पैसे घेत. पाकिस्तानमधूनही तिला मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला. आता थेट महिलेला पैसे देणाऱ्या 11 जणांच्या यादीत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याही नावाचा समावेश झाला.
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे या प्रकरणात नाव आल्याने खळबळ उडाली. यावर बोलताना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले की, काल मला हा सगळा विषय लक्षात आला. माझी आणि त्या तोतया अधिकाऱ्याची भेट झाली होती हे वास्तव आहे. माझ्या चुलत भावाच्या मुलाची तिच्यासोबत ट्रेनमध्ये भेट झाली होती. मंदिराला देणगी देण्याची विनंती तिने केली होती. मग ती तोतया अधिकारी माझ्याकडे गावी आली आणि मला भेटली.
रामभद्राचर्य महाराज यांची ती शिष्य असल्याचे सांगत होती. मुलाखतीच्यादरम्यान अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केला असे तिने मला सांगितल होत. मंदिरासाठी मदत मागितली बर मी 20 हजार सुरुवातीला मदत केली होती, त्यानंतर ही मी 2-3 वेळा काही पैसे दिले. आई आजारी असल्याने मला दीड लाख द्या अशी मागणी तिने मला केली होती. कल्पना भागवतचा कोल्हापूर इथे अपघात झाल्याचे मला एका पुरुष व्यक्तीने फोनवर सांगितल तेंव्हा मी 10 हजार रुपये दिले.
29 ऑक्टोबर रोजी मी शेवटचे पैसे पाठवले आहेत. मी विषय खूप गांभीर्याने घेतला नव्हता पण अडचण आहे म्हणून मी तिला मदत केली होती. 2-3 वेळा माझी आणि तिची भेट झाली होती. मी तिला गरज म्हणून मदत केली होती. माझ्या वडिलांपासून मी राजकारणात आहे. मला पद्मश्री वैगेरे का देतील. माझ्याकडे जेवढं असत तेवढं मी वाटप करत असतो, असे नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले.