शरद पवारांच्या पक्षाचा खासदार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट
MP Nilesh Lanke Health : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांना 4 दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे त्यांना 4 दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या सुधारली असल्याची माहिती समोर आली आहे. आता दोन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
प्रकृतीबाबत अपडेट
निलेश लंके यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. यानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली तब्ब्येत चांगली असल्याची माहिती दिली होती. लंके यांनी म्हटले होते की, दैनंदिन कार्यक्रमांच्या दगदगीमुळे माझी प्रकृती थोडी अस्वस्थ झाली होती. मात्र योग्य वेळी उपचार घेतल्यामुळे आता प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. आपल्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल.
“दोन दिवसांपूर्वी दैनंदिन कार्यक्रमांच्या दगदगीमुळे माझी प्रकृती थोडी अस्वस्थ झाली होती. मात्र योग्य वेळी उपचार घेतल्यामुळे आता प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही. आपल्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन!”
– खा.निलेश लंके
— Nilesh Lanke – निलेश लंके (@INilesh_Lanke) May 8, 2026
निलेश लंके यांच्या तब्ब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या समर्थकांनी आज नाशिकमधील काळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी त्यांची तब्ब्येत पूर्ववत होण्यासाठी समर्थकांनी काळारामाकडे साकडं घातलं. यावेळी दुग्धाभिषेकही करण्यात आला. तसेच आज बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी निलेश लंके यांची भेट घेत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. आता दोन दिवसात लंके यांना रुग्णालयातून घरी सोडलं जाणार आहे.
अहिल्यानगर दक्षिणचे खासदार
दरम्यान, निलेश लंके हे अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी 2024 च्या निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव केला होता. त्याआधी ते पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा पराभव झाला होता. या मतदारसंघात काशिनाथ दाते यांनी विजय मिळवला होता.
निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामांमुळे ते चर्चेत आले होते. त्यांनी चालवलेल्या कोविड सेंटरमध्ये हजारो रुग्णांनी उपचार घेतले होते. त्यावेळी संपूर्ण राज्यात त्यांच्या कार्याची चर्चा झाली होती. त्यांच्या याच कार्याची दखल घेत जनतेने त्यांना लोकसभेला विजयी केले होते.