‘आम्ही ठरवू अमित शाह देशात राहातील की देशाच्या तुरुंगात’, संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, या कार्यक्रमामध्ये बोलताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.

आम्ही ठरवू अमित शाह देशात राहातील की देशाच्या तुरुंगात, संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2025 | 7:53 PM

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, या कार्यक्रमामध्ये बोलताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आपण चिडलं पाहिजे. आपल्याला संताप आला पाहिजे. निवडणूक आयोग किंवा अमित शाह ठरवणार नाहीत की शिवसेना कुणाची आहे? उद्या आम्ही ठरवू अमित शाह हे देशात राहातील की देशाच्या तुरुंगात राहातील असा घणाघात यावेळी राऊत यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत? 

संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. असंख्य संकटं आली, गेल्या 60 वर्षांमध्ये शिवसेनाप्रमुखांसमोर त्यांनी घडवलेली माणसं सोडून गेली. उद्धव ठाकरेंनी मोठी पदे दिली ते सोडून गेले. बाळासाहेब असतील, उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो, आपण माकडांची माणसं केली. ठाकरेंनी माकडांची माणसं केली. त्या माणसांना सरदारही आपणच केलं. त्या सरदारांनी आपल्या पाठीत घाव घातला, हे आम्ही सातत्याने पाहतो. एवढ्या हल्ल्यानंतर शिवसेना झुकली नाही, वाकली नाही. या भूतलावर ५६ इंच छातीवाले लोक आहेत, पण एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात. आमच्या नेत्यालाही अनेक फोन आणि दबाव आले. पण आम्ही झुकलो नाही. सरेंडर होण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे. आमचं नाही. या देशात काय चाललंय? असा सवाल यावेळी राऊत यांनी केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणले की, काश्मीर या देशाचं महत्त्वाचं अंग आहे. राज्यातील अनेक पर्यटक पहलगाममध्ये जातात. तिथे चार अज्ञात लोक बंदूक घेऊन येतात आणि धर्म विचारून आमच्या माय भगिनीवरच्या माथ्यावरचं कुंकू पुसतात. देशात हाहाकार माजतो. दोन महिने हल्ल्याला झाले तरी चार अतिरेक्यांचा शोध ५६ इंचाचं सरकार घेऊ शकले नाही. कुठे गेले ते अतिरेकी. तुम्ही पाकिस्तानवर बॉम्ब टाकला, मिसाईल टाकली पण प्रश्न अजून आहे. ज्या अतिरेक्यांनी माय भगिनींचे कुंकू पुसलं ते अतिरेकी कुठे गेले. आकाशात गेले, पाताळात गेले की जमिनीत गेले. गृहमंत्र्यांना त्यांचा शोध घेता आला नाही, असा निशाणा राऊत यांनी साधला आहे.