
“मोदींच्या दौऱ्याकडे आता कोणाच लक्ष नाहीय. तो दौरा कोणाच्या खिजगणतीतही नाहीय. मणिपूरमध्येच विरोध होतोय. त्यामुळे पीएमचा दौरा त्या बद्दल फार न बोलल बरं. देशात त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहेत. काही गोष्टींकडे लोकांच लक्ष जाऊ नये म्हणून ते असे उपक्रम साजरे करतात. उद्या भारत-पाकिस्तान सामना दुबईत होतोय. देशात त्याला विरोध होतोय. मग त्यावरच लक्ष विचलित करायचं म्हणून त्यांची इवेंट मॅनेजमेंट टीम असे कार्यक्रम ठरवते. आम्ही त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. जेव्हा गरज होती. जेव्हा तिकडे महिलांची नग्न धिंड काढली जात होती रस्त्यावर. कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरु होती, त्यावेळी हे देशाचे पीएम कुठे होते? तेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही, मग आता का जातायत? हे बकवास ढोंग आहे” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर टीका केली.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या तिकिटांना फारसा प्रतिसाद नाहीय.त्यावर राऊत म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत, जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी पहलगाम हल्ला पाहिलाय, देश त्या धक्क्यातून अजूनही सावरलेला नाही असे लाखो क्रिकेटप्रेमी असले, तरी ते हा सामना पाहणार नाहीत. भाजपचे लोक पाहतील, राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाहीत. त्या सामन्याला बसलेले भारतीय चेहरे लोकांना दिसले, तर लोक त्यांना इथे आल्यावर जोडे मारतील. जय शाह त्या मॅचला जाऊन बसतात का ते पाहू”
‘मग जनसुरक्षा कायद्याखाली भजबळांवर कारवाई करणार का?’
आरक्षणाच्या मुद्यावरही राऊत बोलले. “देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. राज्यातले सगळे राज्यातंर्गत, कॅबिनेट प्रश्न सोडवायला फडणवीस समर्थ आहेत. उद्या मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. गँगवार होईल कॅबिनेटमध्ये एकदिवस. मला माओवादी ठरवतायत. कॅबिनेटमध्ये संघर्ष सुरु आहे. सरकारमध्ये टोकाचा संघर्ष आहे. भुजबळ म्हणतात महाराष्ट्रात अराजक होईल, मग जनसुरक्षा कायद्याखाली भजबळांवर कारवाई करणार का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
‘यात काय देशद्रोह आहे?’
“माझ्यावर कारवाई करावी म्हणून मिंधे यांचे लोक पोलीस आयुक्तांना भेटले. महाराष्ट्रात पराकोटीचा भ्रष्टाचार, अनागोंदी वाढली आहे. सरकारने काळजी घेतली पाहिजे.नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक गाठलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर उतरली, सरकार उलथवून टाकलं. म्हणून महाराष्ट्रातील, देशातील भ्रष्ट नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे. यात काय देशद्रोह आहे?” असा प्रश्न राऊतांनी विचारला.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी
“आरक्षणाच्या विषयावर लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली आहे. लातूरात आत्महत्या झाली. इतक ठिकाणी आत्महत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे. जनतेच्या मनात शंका आहेत आरक्षणाबद्दल. त्या संदर्भातील प्रश्नांना त्यांनी सरकारच्यावतीने रोखठोक पुराव्यासह उत्तरं दिली पाहिजेत. एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला. त्यावर तुम्ही मतं मागणार आहात. तुम्ही पत्रकार परिषद घ्या. मराठा, ओबीसी आरक्षणावरुन जो गोंधळ, अराजक निर्माण झालय त्यावर जनतेशी संवाद साधा” असं संजय राऊत म्हणाले.