एसटीची ‘हाफ तिकीट’द्वारे फुल कमाई सुरूच, दहा दिवसांत 34 कोटी कमविले

| Updated on: Mar 28, 2023 | 6:56 PM

एसटी महामंडळाची महीलांना अर्धे तिकीट आकारण्याची 'महिला सन्मान योजना' एसटीला चांगलीच फायद्याची ठरू लागल्याची आकडेवारी आली आहे. महिलांच्या अर्धे तिकीट योजनेचा धसका खाजगी ट्रॅव्हल्सनेही घेतला आहे.

एसटीची हाफ तिकीटद्वारे फुल कमाई सुरूच, दहा दिवसांत 34 कोटी कमविले
MSRTC
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : महिलांना एसटी महामंडळाने अर्धे तिकीट आकारण्यास सुरूवात केल्यानंतर महिलांचा ओढा लालपरीकडे चांगलाच वाढला आहे. गेल्या दहा दिवसात एसटीने 1 कोटी 30 लाख 65 हजार महिलांनी प्रवास केल्याने एसटीच्या तिजोरीत दहा दिवसांत 34 कोटीची भर पडली आहे. तेवढीच रक्कम महामंडळाला प्रतिपूर्तीपोटी मिळणार असल्याने महामंडळाला एकूण 68 कोटीचा लाभ होणार आहे. सध्या राज्य सरकार दर महिन्याला एसटीला सर्व सवलतींच्या प्रतिपूर्ती रक्कमेपोटी 220 कोटी रुपये देत असते ! आता महिला सन्मान योजनेमुळे दर महिन्याला प्रतिपूर्ती रक्कमेत 100 कोटी रुपयांची भर पडणार असल्याने ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे !

एसटी महामंडळाने 17  मार्चपासून महिला प्रवाशांना अर्धे तिकीट आकारणारी महिला सन्मान योजना सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सेवांमधून महिलांना अर्धे तिकीट योजना घोषीत केली, आणि 17 मार्चपासून ही योजना प्रत्यक्षात लागू झाली, त्यामुळे महिलांच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे, पहिल्या आठवड्यातच एसटीने 76 लाख पेक्षा जास्त महिलांनी अर्ध्या तिकिटात प्रवासाचा लाभ घेतला. त्यामुळे आठवडाभरात सुमारे 20 कोटी रूपये एसटी महामंडळाने कमविले होते. आता दहा दिवसात एसटीतून एकूण 1 कोटी 30 लाख 65 हजार महिला प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला आहे. त्यामुळे एसटीला 34 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. राज्य सरकार प्रतिपूर्ती रकमेचे 34 कोटी राज्य सरकारला देणार असल्याने एकूण 68 कोटीचे उत्पन्न एसटीला मिळणार आहे.

या योजनेने देखील प्रवासी वाढले

एसटीला कोरोनाकाळात प्रवासी संख्या घटल्यामुळे एसटीची आर्थिक कोंडी झाली होती, आता गेल्यावर्षी 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची योजना लागू केल्याने एसटीचे प्रवासी वाढण्यास सुरूवात झाली आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवास योजनेमुळे एसटीने कधी प्रवास न करणारे देखील एसटीचा प्रवास करायला लागले. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होत गेली. त्यातच महिलांना हाफ तिकीट योजना 17 मार्चपासून लागू करण्यात आल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे.

अशी वाढली महिलांची संख्या 

17 ते 27 मार्च या दहा दिवसात महामंडळाच्या संभाजीनगर विभागातून 19  लाख 93  हजार 019  महिलांनी प्रवास केल्याचे आकडेवारी समोर आली आहे तर मुंबई विभागातून 24 लाख 50 हजार 439 , नागपूर विभागातून 32 लाख 98 हजार 635 , पुणे विभागातून 32 लाख 98 हजार 635, नाशिक विभागातून 23 लाख 74 हजार 492 तर अमरावती विभागातून 13 लाख 79 हजार 346 महिलांनी प्रवास केला आहे. एकूण एक कोटी 30 लाख 65 हजार 167 महिलांनी दहा दिवसात लालपरीतून प्रवास केला आहे.