आज उपद्रवींची खैर नाही, दिसताच दणका? तिसऱ्या दिवशीही मोठी कारवाई, वांद्र्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढणार
वांद्रे येथील गरीब नगर झोपडपट्टीमधील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. अनधिकृत झोपड्या पाडताना स्थानिक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, यात काही पोलीस जखमी झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५०० अतिक्रमणे काढण्यात येत असून, उर्वरित कारवाई पूर्ण करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

वांद्रे येथील गरीब नगर झोपडपट्टीमधील अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. गरीब नगरमधील रेल्वेच्या या कारवाईचा आज तिसरा दिवस आहे. . रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून या झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. काही झोपड्या तर चक्क तीन ते चार मजली होत्या, हे बांधकामही अनधिकृत होतं. त्यामुळे या सर्व झोपड्यांवर गेल्या दोन दिवसांपासून बुलडोझर फिरवण्याचं काम सुरू असून अनेक झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. मात्र सलग दोन दिवस या झोपड्यांवर बुलडोझर चालवल्यानंतरही अजूनही काही काम बाकी आहे. त्यामुळे आज पुन्हा इथे ही कारवाई करण्यात येणार आहे. मात्र काल संध्याकाळी अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकासमोर तेथील स्थानिक लोक चांगलेच आक्रमक झाले होते. पश्चिम रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या या तोडक कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे आज मात्र चांगलीच खबरदारी घेतली जाणार असून पोलिस बंदोबस्त तैनात आहे. उपद्रवी लोकांना मोठा दणका देण्यात येणार आहे.
जमाव आक्रमक, पोलिसांवर दगडफेक
वांद्रे पूर्व रेल्वे परिसरातील गरीब नगर भागात दोन दिवसांपासून कारवाई सुरू आहे, रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर बुलडोझरच्या साहाय्याने पाडकाम करण्यात आले. कालही हे पाडकाम सुरू होता, मात्र काल संध्याकाळी काम सुरू असताना जमाव आक्रमक झाला होता. या पाडकामाला विरोध दर्शवत अनेक लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. ते अतिशय आक्रमक झाले होते, कारवाई सुरू असताना पोलिसांना टार्गेट करण्यात आलं. पोलिसांनी या लोकांना समवजावण्याचा, रोखण्याचा प्रयत्न केला खरा, पण लोकं थांबले नाहीत, दगडफेक सुरूच राहिली, त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली.
तोडक कारवाईवेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, जमावाने पोलिसावर बाटल्या आणि दगड फेकले. यामुळे काही पोलिस कर्मचारी जखमीही झाले. त्यामुळे त्यांना रोखण्यालाठी पोलिसांनीही कारवाई केली, त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र त्यामुळे जमाव आणखीनच भडकला . अखेर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही लोकांना ताब्यात घेतलं, तेथे बराच काळ तरूणांची धरपकड सुरू होती.
आज उपद्रवी लोकांची खैर नाही
कालच्या घटनेत दगडफेकीमुळे काही पोलिस जखमी झाले. दरम्यान गरीब नगर येथे आजही पाडकाम कारवाई सुरू राहणार असून कालच्या घटनेमुळे थोडं तणावाचं वातावरण आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 500 बेकायदेशीर अतिक्रमण काढणार आहेत.काल संध्याकाळपर्यंत पाडकामाचे 60 टक्के काम पूर्ण झाले असलं तरी उरलेल्या 40 टक्के अतिक्रमणांवर आज कारवाई होणार आहे. पण कालच्या दगडफेकीमुळे कारवाईला गालबोट लागलं. असं असंल तरीही आज पुन्हा एकदा, सलग तिसऱ्या दिवशी, रेल्वे अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. आज पहाटेपासूनच रेल्वे प्रशासन आणि पोलीस दल पुन्हा सज्ज झालं आहे. कालच्याप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जे लोक कारवाईत खोडा घालण्याचा प्रयत्न करतील अथवा ही कारवाई रोखण्याचा प्रयत्न करतील, त्यांना पोलिसांकडून प्रसाद खावा लागेल. उपद्रवी लोकांना चांगलाच दट्ट्या पडणार आहे.