
लोकसभा निवडणूक संपली अन् आता वेध लागलेत ते विधानभा निवडणुकीचे… अशात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रहारचे अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठं विधान केलं आहे. बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मी शिंदे सरकारवर नाराज नाही. पण जर या सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर मात्र आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी करावी लागेल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
मी सरकारवर नाराज नाही. पण जर सरकारने शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर मात्र आम्हाला राज्यामध्ये तिसरी आघाडी उघडावी लागेल. तिसऱ्या आघाडीच्या मार्फत आम्ही 15 ते 17 जागा या विधानसभेमध्ये लढवू आणि त्या जिंकू देखील, असा आम्हाला विश्वास आहे. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत जे मार्गी अद्यापही लागलेले नाहीत. त्यामुळे वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावा लागेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी आम्ही रविकांत तुपकर यांची देखील भेट घेतली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबतही आमची बैठक होणार आहे. येत्या निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीचा आम्ही विचार करत आहोत, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्यया पार्श्वभूमीवर ही तिसरी आघाडी होते का? आणि या आघाडीत कोण-कोणते पक्ष सामील होतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलं काम करत आहेत. त्यांच्या ज्या योजना आहेत. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. पण त्यासोबतच त्याची जाहिरात त्यांच्या पक्षासाठी होऊ नये ही आमची भूमिका आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ सर्वसामान्य माता भगिनींना महाराष्ट्रामध्ये व्हावा, अशी आमची भूमिका आहे. माझ्या मुलाला मी केवळ एवढाच सल्ला देईन की त्याने बिजनेस मॅनेजमेंटचा अभ्यास पूर्ण करावा. त्याने आधी एक चांगला उद्योजक बनाव राजकारणामध्ये येण्याचा सल्ला मी त्याला कधीही देणार नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.