
मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांना अर्धा पगार रोख तर अर्धा त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन (ECS) स्वरुपात मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. आधुनिक काळात सर्वांना पगार थेट बँक खात्यावर मिळत असताना आणि बेस्टमध्येही ही पद्धत असताना आता मात्र पुन्हा पगार रोखीने आणि नाण्यांच्या स्वरुपात दिल्याने बेस्टची प्रगती होण्याऐवजी अधोगती होत आहे. यास कारण म्हणजे बेस्टच्या प्रवाशांकडून जमा होणाऱ्या नोटा आणि नाणी पडून आहेत. पूर्वी ही नाणी बँकेत जमा केली जात होती. परंतू आता ही नाणी तशीच पडून आहेत. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आपला वेळ घालवून रांगेत उभे राहून संबंधित विभागातून हा रोख पगार नोटा आणि नाणी मोजून घ्यावा लागत आहे.
या संदर्भात मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक ( आयुक्त ) भूषण गगराणी आणि बेस्टचे महाव्यवस्थापक एस.श्रीनिवासन यांना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुहास सामंत यांनी पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.आधुनिक जगात ECS ऑनलाईन पगार थेट सर्व कामगार वर्गाच्या पगारात मिळण्याची चांगली पद्धत गेली कित्येक वर्षे व्यवस्थित चालू होती. परंतू ल्या काही वर्षात बेस्टचे नियोजन शून्य होत आहे.कारण वाहतूक आणि विद्युत पुरवठा विभागातून रोज येणारी रोख रक्कम बेस्टच्या रोख विभागात तशीच पडून आहे.पूर्वी बेस्टचे अकाऊंट आणि ऑडिट विभागाचे अधिकारी रोज जमा होणाऱ्या रोखीच्या पैशाचे योग्य नियोजन करून प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या ठिकाणी योग्य गुंतवणूक करून या पैशाचे व्याज बेस्टच्या तिजोरीत जमा करीत होते.पण गेल्या काही वर्षात या विभागातील अधिकारी वर्गाचे बेस्टच्या येणाऱ्या रोखीच्या पैशाकडे पूर्ण पुणे दुर्लक्ष होत आहे.आणि येणारी रोजची रोख कॅश तशीच पडून आहे असा आरोप सुहास सामंत यांनी केला आहे.
बेस्टच्या सर्वच कार्यरत कामगारांना प्रत्येक महिन्याचा अर्धा पगार ECS ऑनलाईन पद्धतीने बँकेत जमा होत आणि अर्धा पगार प्रत्येकाच्या विभागात जाऊन बेस्ट कर्मचाऱ्यांना घ्यावा लागत आहे.यामुळे सर्वच कामगार वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.काहीच्या कामाच्या जागेपासून पगार घेण्यासाठी दुसऱ्या विभागात जाऊन घ्यावा लागत आहे,त्यामुळे वेळ वाया जात आहे.त्यावेळेत या कामगाराने आपले उपक्रमाचे काम करण्यास वेळ घालवला असता.ज्या कर्मचारी वर्गाचे कर्ज आहेत त्यांना दर महिना रोखीत घेतलेला पगार परत जाऊन बँकेत जमा करावा लागत आहे.
काहींना अर्धा पगार रोख आणि अर्धा पगाराच्या स्लिपमध्ये पगार ऑनलाईन बँकेत येतो त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाही. हा विषय अतिशय गंभीर असून आधुनिक जगात भारत पुढे जात असताना बेस्ट उपक्रम पुन्हा मागे जात आहे.त्यामुळे आपण या विषयात लक्ष घालून संबंधित अधिकारी वर्गास याबद्दल योग्य सूचना कराव्यात अशी विनंती सुहास सामंत यांनी केली आहे.