मुंबई-गोवा क्रूझवरील कर्मचाऱ्याला कोरोना, 2000 प्रवाशांची शिपवरच अडवणूक

आरोग्य अधिकारी क्रूझवरील सर्व दोन हजार प्रवाशांची कोरोना चाचणी घेत आहेत. हे प्रवासी त्यांच्या अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला.

मुंबई-गोवा क्रूझवरील कर्मचाऱ्याला कोरोना, 2000 प्रवाशांची शिपवरच अडवणूक
मुंबई गोवा क्रूझ (फाईल फोटो) - सौजन्य ट्विटर
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 9:31 AM

मुंबई : मुंबई-गोवा कॉर्डेलिया क्रूझवर (Mumbai-Goa Cordelia cruise) एका क्रू मेंबरला कोरोनाची लागण झाल्यानंतर किमान 2,000 प्रवाशांना आडकाठी करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही शिप मुंबईहून निघाली होती, तर गोव्यातील मुरगाव (Mormugao) क्रूझ टर्मिनलवर उतरली होती.

आरोग्य अधिकारी क्रूझवरील सर्व दोन हजार प्रवाशांची कोरोना चाचणी घेत आहेत. हे प्रवासी त्यांच्या अहवालाची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशी माहिती Live Hindustan ने दिली आहे. त्यामुळे गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला.

कोरोनाग्रस्त क्रू मेंबर आयसोलेशनमध्ये

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या क्रू मेंबरला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये संबंधित क्रू कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.

अहवाल येईपर्यंत क्रूझवरच थांबा

अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत क्रूझवरच राहण्यास सांगितले आहे. या क्रूझ जहाजाच्या चालकांना वास्कोस्थित साळगावकर मेडिकल रिसर्च सेंटर या हॉस्पिटलमधून सर्व प्रवाशांच्या कोव्हिड-19 चाचण्या घेण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, 15 ते 18 वयोगटासाठी कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर पुढील चार दिवसांत सर्व 72 हजार किशोरवयीन मुलांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट गोवा सरकारने ठेवले आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी सांगितले.

“गोव्याला 15 ते 18 वर्षे वयोगटातील टीनएजर्सना लसीकरण करण्यासाठी 72,000 डोस आधीच प्राप्त झाले आहेत, 3 जानेवारीपासून 3 ते 4 दिवसांत ते दिले जातील,” असे विश्वजीत राणेंनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या :

Garhwal | पाऊण महिन्यांपूर्वी मुंबईहून निघाले, दोघे पर्यटक उत्तराखंडमध्ये मृतावस्थेत, रस्ता हरवल्यानंतर बर्फाखाली गाडले?

मुंबईत 9 लाख किशोरवयीन मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका क्लिकवर