
मुंबईकरांची लाईफलाइन ही लाईफ घेणारी ठरत्ये की काय असा प्रश्न पडावा अशा घटना घडत आहेत. प्रचंड गर्दी, त्यात कसंबसं शिरून गाडीतून प्रवास करायचा, कधी हात निसटून खाली पडलं तर कपाळमोक्ष ठरलेला… मुंबईकरांसाठी रोजचा प्रवास हा जीवघेणा ठरत आहे. याच लोकलमधून प्रवास करताना डोंबिवलीतल्या 12 वीत शिकणाऱ्या मुलाचा खाली पडून मृत्यू झाला. यानंतर प्रचंड संतापाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने रेल्वे प्रबंधक कार्यालयावर धडक दिली. त्यावेळी अनेक मागण्या करण्यात आल्या. रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्देवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेत धिम्या लोकलच्या चालवाव्यात, तसेच, दहावी , बारावी परीक्षार्थींसाठी लोकलचा एक डबा राखीव ठेवावा, आदी मागण्या होत्या. तसेच रेल्वे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला.
काय घडलं ?
सध्या 12 वीची परीक्षा सुरू आहे. डोंबिवली येथे राहणारा सोहम कटरे हाही 12 वीत होता. 10 फेब्रुवारी रोजी बारावीचा पहिला पेपर देण्यासाठी तो निघाला. मात्र दिवा-मुंब्रा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून सोहमचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सगळेच हादरले. वाढत्या गर्दीमुळे लोकांचा जीव जाण्याच्या घटना सतत घडतच आहेत. त्यात आणखी एकाचा बळी गेला.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने रेल्वे प्रबंधक कार्यालयावर मोर्चा काढला. वाढत्या गर्दीला सामावून घेण्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहेत, असा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रबंधक कार्यालयावर ही धडक देण्यात आली.यावेळी स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांच्याशी चर्चा झाली, तेव्ह मनोज प्रधान, नगरसेवक सुधीर भगत, नगरसेविका दिपाली भगत, मनिषा भगत यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. या समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन देवधर यांनी दिले.
काय आहेत मागण्या ?
वाढत्या गर्दीमुळे पडून 12 वीत शिकणाऱ्या सोहमचा जीव गेला. त्यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी धिम्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी. पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांची निर्मिती केल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवर धिम्या रेल्वेगाड्या चालवणे गरजेचे आहे, मात्र असे असतानाही तिथे जलद गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे, कोपर, ठाकूर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवरील गर्दी वाढत असते. म्हणूनच तिसऱ्या (अप) व चौथ्या (डाऊन) मार्गिकेवर गर्दीच्या वेळात ( सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 ) धिम्या गाड्या चालवाव्यात अशी मागणी करण्यात आली.
तसेच 15 डब्यांच्या लोकल चालविण्याऐवजी आणि एसी लोकलची संख्या कमी करून त्यावेळी धिम्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात. दिवा स्टेशनवरील होम प्लॅटफॉर्मवरून लोकल सुरू करावी आणि मुंब्रा येथून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने शक्य असल्यास मुंब्रा ते छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस लोकल सुरू करावी अशाही मागण्या केल्या. त्या मागण्यांचे एक निवेदन हे स्टेशन प्रबंधक अपर्णा देवधर यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन पुढे वर्ग करावे यासंदर्भात स्टेशन प्रबंधक देवधर यांनी शिष्टमंडळास सांगितले.
काय म्हणाले मनोज प्रधान ?
मध्य रेल्वेवर वर्षाकाठी 2180 अपघाती मृत्यू होत आहेत. ठाणे स्टेशन परिसरात वर्षाला 287 अपघात होत आहेत. म्हणजेच दररोज सरासरी सात मृत्यू होतात. हे बळी फक्त गर्दीमुळे जातात. एसी ट्रेनची गरज असली तरी सलग एसी ट्रेन न चालविता दोन एसी ट्रेनदरम्यान दोन ते तीन साध्या लोकल सोडणे गरजेचे आहे. जेणेकरून गर्दीचा निचरा होईल, असं मनोज प्रधान म्हणाले.
मुंब्रा स्टेशन येथे कौसा, शिळपासूनचे लोक येत आहेत. तेथेही होम प्लॅटफॉर्मची गरज आहे. आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची वेळ गर्दीच्या काळातील नसावी, यासाठी शिक्षण खात्याला विनंतीकरणार असून परिक्षार्थींसाठी एक डबा राखीव ठेवावा अशी मागणीही रेल्वेकडे केल्याचे त्यांनी सांगितलं.