Mumbai Local : लोकलमध्ये पुन्हा राडा, सीटवर झोपली म्हणून संतापला, थेट बेल्ट काढून धमकावलं

मुंबई लोकल सध्या प्रवासासाठी नव्हे, तर वाढत्या भांडणे, हिंसाचार आणि मारामारीसाठी चर्चेत आहे. मागील महिन्यात झालेल्या हत्येपासून ते नुकत्याच एका महिलेवर झालेल्या हल्ल्यापर्यंत, अनेक घटनांनी प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणली आहे. सहप्रवाशांची उदासीनता चिंतेचा विषय बनली असून, तातडीने कठोर उपाययोजनांची गरज आहे.

Mumbai Local : लोकलमध्ये पुन्हा राडा, सीटवर झोपली म्हणून संतापला, थेट बेल्ट काढून धमकावलं
mumbai local dispute
| Updated on: Aug 07, 2026 | 1:42 PM

मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सध्या प्रवासासाठी कमी आणि भांडणांसाठी जास्त गाजत्ये. गेल्या काही महिन्यात लोकलच्या तिन्ही मार्गांवर भांडण, मारामाऱ्या , अगदी खून झाल्याच्याही भयानक घटना घडल्या असून त्यामुळे मुंबईकर मात्र जीव मुठीत धरून प्रवास करत असतात. गेल्याच महिन्यात पश्चिम रेल्वे मार्गावर पावसात ट्रेनचा दरवाजा बंद करण्याच्या मुद्यावरू झालेल्या वादात एका तरूणाने जीव गमावला. त्याचा ज्याच्याशी वाद झाला , त्या तरूणीने त्याचा बॅगमधून थेट टाकू काढून त्याच्यावर भर लोकलमध्ये वार केले, गंभीर जखमी झालेला तो तरूण रक्ताच्या थारोळ्यात डब्यात खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेने पसरलेली दहशत अद्याप कमी झालेली नसतानाच, मुंबई लोकलमध्ये पुन्हा राडा झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार लोकल ट्रेनच्या पुरुषांच्या डब्यात घडला. संबंधित महिला डब्यातील एका सीटवर झोपली होती. याच कारणावरून एका पुरुष प्रवाशाने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीने महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि तिच्यावर हात उगारला. त्याचा एक व्हिडीओही समोर आला असून तो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे.

आधी धमकावलं, मग बेल्ट काढून..

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, संबंधित पुरुष प्रवासी महिलेला धमकावत असून, त्याने कमरेचा पट्टा काढून तिला मारण्याची भीती दाखवली. या संपूर्ण प्रकारादरम्यान डब्यात अनेक पुरुष प्रवासी उपस्थित होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या एकाही प्रवाशाने पुढे येऊन त्या व्यक्तीला रोखण्याचा, भांडण थांबवण्याचा किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

प्रवाशांची उदासीनता चिंताजनक

या घटनेमुळे केवळ मारहाणीचा प्रकारच नव्हे, तर सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अशा घटनांमध्ये प्रवाशांकडून दाखवण्यात येणाऱ्या उदासीनतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. संकटात असलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी पुढे येण्याऐवजी अनेक प्रवासी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवर काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये जे हत्याकांड झालं, तेव्हाही कोणीच पुढे आलं नव्हतं, त्यामुळे अवघ्या विशीतल्या तरूणाला जीव गमावावा लागला होता.

मात्र, हा प्रकार नेमका कोणत्या मार्गावरील किंवा कोणत्या लोकल ट्रेनमध्ये घडला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. संबंधित प्रवाशाची ओळख पटवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us