पर्सनल कामं उरकून घ्या, आठ दिवस पावसाचं धुमशान, हवामान खात्याचा मुंबईसाठी इशारा काय?

मुंबईत उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच मान्सूनचा दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाने येणाऱ्या आठवड्यात मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्सनल कामं उरकून घ्या, आठ दिवस पावसाचं धुमशान, हवामान खात्याचा मुंबईसाठी इशारा काय?
| Updated on: May 21, 2025 | 9:51 AM

उष्णता, उकाडा, चिकचिक, घामाच्या धारा… उन्हाळ्यामुळे वैतागलेल्या मुंबईकरांना आता चांगलाचा दिलासा मिळणार असून येत्या काही दिवसांतच मान्सूनचे अधिकृत आगमन होणार आहे. या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनचा आता हा प्रवास अधिक वेगवान होऊन आठवडा अखेरीपर्यंतच दाखल होईल असे पूर्वानुमान भारतीय हवामान विभागाने वर्तवलं आहे. यंदा मान्सूनची वेगाने घोडदौड सुरू आहे. केरळबरोबरच तमिळनाडूमध्ये आणि ईशान्येच्या राज्यांमध्येही मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज आहे. हवामान विभागाने 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती.

मान्सूनची नैऋत्य आणि ईशान्य या दोन्ही शाखांचा वेगाने प्रवास सुरू असल्याने चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये, मालदीव आणि कोमोरिन येथील उर्वरित परिसर, लक्षद्वीपचा काही भाग, केरळ, तामिळनाडू, बंगालचा उपसागराचा दक्षिण आणि मध्य भाग, बंगालच्या उपसागराचा ईशान्येकडचा भाग, ईशान्येकडील राज्ये येथे मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले.

मान्सूनपूर्व सरींनी मुंबईला झोडपलं; पुढील आठवडाभर पावसाचा इशारा 

मुंबईत मंगळवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व सरींनी शहरातील जोगेश्वरी, अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि मीरा रोड परिसर भिजवलं. जोगेश्वरीत 7 ते 8 या वेळेत सर्वाधिक 63 मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे आणि नवी मुंबईतही जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारे (50-60 किमी/तास) आणि मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. एवढंच नव्हे तर येता आठवडाभर हे पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सावध राहण्याचेही आवाहन करण्यात आलं आहे.

नुकत्याचझालेल्या पावानंतर साकीनाका ते अंधेरी स्थानक दरम्यान अनेक रस्त्यांवर पाणी साचले, अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. चांदिवली नागरिक कल्याण संघाने सोशल मीडियावर वाहतूक कोंडीचे फोटो शेअर केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, उपनगरांतील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. तर पवईत एका झाड कोसळण्याच्या घटनेत 40 वर्षांची महिला गंभीर जखमी झाली. ठाणे, रायगड, पालघर येथेही आठवडाभर वादळी वारे आणि पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मुंबईच्या पूर्वमुक्त मार्गावर मान्सूनपुर्व कामाला सुरवात

मुंबईच्या पूर्वमुक्त मार्गावर मान्सून पुर्व कामाला सुरवात झाली असून ठाण्याच्या दिशेला वडाळा एंडला एक्स्पान्शन जॉइंटच्या कामाला गती आली आहे. विशेषतः टेकबेम एक्स्पान्शन जॉइंटचा वापर करून पुलाच्या दोन्ही सांध्यांना जोडण्याचं काम सुरू आहे. काँक्रिट आणि टेकबेमचा वापर करून पुलांमधील हे सांधे भरले जात आहेत, याने वाहतूक सुरळीत होण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. गेल्या दीड वर्षांपासून हे काम प्रलंबित होतं, अनेक अपघात या ठिकाणी होता होता वाचले होते, अखेरकार या कामाला मुहूर्त सापडला आहे. 10 दिवसांत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.