Anti-Narcotics Van: ड्रग्ज तस्करांना सुट्टी नाही..! मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आलं डेंजर अस्त्र; कारवाई होणार जलद!
ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एंटी नार्कोटिक्स सेलच्या नव्या व्हॅनचा वापर होणार आहे. मुंबई पोलिसात पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू होत असून नवी व्हॅन आजपासून कार्यान्वित होत आहे.

Mumbai Police Anti-Narcotics Van: गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरात ड्रग्ज तस्करांचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणांवर कारवायांचा धडाका सुरु असूनही ड्रग्जची अनेक गंभीर प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक पाऊल…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एंटी नार्कोटिक्स सेलच्या नव्या व्हॅनचा वापर होणार आहे. मुंबई पोलिसात पहिल्यांदाच हा उपक्रम सुरू होत असून नवी व्हॅन आजपासून कार्यान्वित होत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाची ही व्हॅन आज महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी एका कॉन्सर्टच्या अनुषंगाने लावण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये अशी प्रणाली आहे की ड्रग्सचे सेवन केल्यास अगदी पाच मिनिटात कुठल्या प्रकारच्या ड्रग्सचे सेवन केले आहे त्याचा रिसल्ट मिळणार आहे.
काय आहेत या व्हॅनची वैशिष्ट्ये?
अमली पदार्थविरोधी कारवाई करताना घटनास्थळावरील पंचनामा, चित्रिकरण आणि पुराव्यांचे संकलन एकाच ठिकाणी करता यावे हा या अँटी-नार्कोटिक्स व्हॅनचा मुख्य उद्देश आहे.
त्याचबरोबर संकलित केलेले पुरावे सुरक्षित आणि विश्वासर्हत अवस्थेत राहण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
या व्हॅनमध्ये असलेल्या ‘तपास सारथी’ प्रणालीमुळे गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्ष ठेवता येणार आहे.
सायबर गुन्हे, सोशल मीडिया आणि डार्क नेटच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांचे स्वरूप बदलत असताना पोलिसांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर या सुविधांमधून भर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
दरम्यान, देशामध्ये पहिल्यांदाच तयार केल्या गेलेल्या या अँटी-नार्कोटिक्स व्हॅनचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अमली पदार्थांविरोधातील कारवाईपासून ते गुन्ह्यांच्या तपासातील पुरावे सुरक्षित ठेवण्यापर्यंतच्या प्रक्रियेत या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी आणि तरुणांमध्ये जरब बसवण्यासाठी हा व्हॅनचा उपयोग होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.