
Mumbai Rains : सध्या संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई तसेच उपनागरांत तर पावसाने अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. मुंबईतील बहुसंख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर तुंबलेले हे पाणी हटवण्यासाठी मुंबई पालिका पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. काही लोकांच्या घरातही पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या जेवण-पाण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्वच बाबींचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला असून त्यांनी पावसाच्या या संकटाला तोंड देण्यासाठी मुंबई तसेच ठाणे पालिकेची काय तयारी आहे? याबाबत सर्व माहिती दिली आहे. मुंबईत तुंबलेले पाणी हटवण्यासाठी एकूण 525 पंम्प कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिंदे यांनी सध्याच्या पावसाचा आढावा घेऊन पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती दिली. नौपाड्यात भांजेवाडी नावाचा परिसर आहे. त्या ठिकाणी जवळपास पाच फुटाच्या वर पाणी साचले होते. त्यामुळे तेथून मी ठाण्याच्या पालिका आयुक्तांना बोलवून घेतलं. त्यानंतर त्या भागात जास्त क्षमता असलेल्या पंपिंगची यंत्रणा लावण्यात आली. नंतर मी सकाळीच मुंबई पालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली. मी मुंबईतील पावसाचा आढवा घेतला. मी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. मी मिठी नदीच्या परिसरातही भेट दिली, असे शिंदे यांनी सांगितले.
तसेच, मिठी नदीजवळ महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यरत होती. तिथे जवळपास 300 ते 350 लोकांना बाजूच्याच इमारतीत हलवण्यात आले आहे. मी या लोकांचीही भेट घेतली. तिथे महापालिकेने अतिशय उत्तम व्यवस्था केली होती. त्या लोकांना तातडीने शिफ्ट केलेलं असलं तरी लोकांना पाणी, चहा, जेवण याची व्यवस्था होती. तिथे डॉक्टरही होते. डॉक्टरांनी तेथील लोकांची तपासणी केली, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.
मिठी नदीच्या बाजूला एनडीआरएफची टीम होती. मिठी नदीच्या परिसरात या टीमने लोकांचे रेस्क्यू केले आहे. कुर्ला, क्रांतीनगर येथील लोकांच्या घरात पाणी गेलेले आहे. तिथे बचावकार्य चालू आहे. तसेच पाणी हटवण्यासाठीही यंत्रणा काम करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना पुराचा धोका पोहोचू शकतो त्या लोकांना हलवण्याचे काम मुंबईने काम केले आहे. पाणी काढण्यासाठी सध्या मुंबईत जवळपास 525 पंम्प काम करत आहेत. मुंबईत सहा मुख्य पंपिंग स्टेशन आहेत. दहा मिनी पम्पिंग स्टेशन्स आहेत. अधिकच्या पंम्पांचीही तयारी ठेवलेली आहे.
दुर्दैवाने गेल्या सहा तासांत 200 मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण हे खूपच जास्त होती. कमी वेळात जास्त पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सध्या सगळीकडेच लोक काम करत आहेत. यंत्रणाही काम करत आहेत. एका चिफ इंजिनिअरना एकच मुंत्रपिंड आहे. त्या मुंत्रपिंडाचे ट्रान्सप्लान्ट करायचे आहे. तरीदेखील ते घरी बसलेले नाहीत. सर्व यंत्रणा अलर्ट आहे.