मुंबईत पाणीबाणी, पाणी टंचाईचे संकट, नवीन बांधकामे,जलतरण तलावांवर पाणी वापर मर्यादा..

पिण्याच्या पाण्याची बचत करण्याकामी महानगरपालिकेला सहकार्य करावे. कोणत्याही ठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. 

मुंबईत पाणीबाणी, पाणी टंचाईचे संकट, नवीन बांधकामे,जलतरण तलावांवर पाणी वापर मर्यादा..
20% water cut
| Updated on: Jun 16, 2026 | 6:15 PM

‘अल नि‍नो’मुळे पावसाने ओढ दिल्‍याने जून महिना अक्षरश: कोरडा गेला आहे. त्यामुळे मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे उपलब्‍ध पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने आता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कंबर कसली आहे.

मुंबई महानगर पालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत. या अंतर्गत मुंबई महानगरात दिनांक १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची बचत सुनिश्चित करण्यासाठी पिण्‍याव्‍यतिरिक्‍त इतर वापरावरही बुधवार, दिनांक १७ जून २०२६ पासून मर्यादा घालण्‍यात आल्या आहेत.

 पाण्याचा गैरवापर झाल्यास कारवाई

सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येणार असून नवीन बांधकामांसाठी दिल्‍या जाणा-या जल जोडणी स्‍थगित करण्यात आल्‍या आहेत. तसेच, सर्व जलतरण तलावांच्‍या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येणार आहेत. औद्योगिक व व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात येणार असून मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा गैरवापर अथवा अपव्यय होत असल्याचे आढळल्‍यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा स्‍पष्‍ट इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्‍या जलसंपदा विभागाच्‍या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने पिण्‍याच्‍या पाण्‍याचे नियोजन करत काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्‍यानुसार, महानगरपालिकेच्‍या जल अभियंता विभागाने पाणी कपातीच्‍या कालावधीत करावयाच्‍या उपायोजनांबाबत सविस्‍तर परिपत्रक निर्गमित केले आहे.

१० टक्के पाणीकपात लागू

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी सध्या प्रतिदिन सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लीटर (MLD) इतकी पाण्याची आवश्‍यकता आहे. उपलब्ध पर्यायामधून मुंबई महानगराला प्रतिदिन सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लीटर इतके पाणी पुरविले जाते. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या सुचनेनुसार मुंबईत दि. १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्‌यात घट झाली असून आज दिनांक १६ जून २०२६ रोजी उपलब्ध पाणी साठा हा १०.३५ टक्के इतकाच शिल्लक आहे. पावसाळा लांबल्‍याने हा पाणीसाठा अधिकाधिक दिवस टिकविण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर आहे.

जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत

महाराष्ट्र शासन जल संपदा विभागाने आता नवी निर्देश लागू केले आहेत.  पाण्याच्या इतर वापरावरही बुधवार, १७ जून २०२६ पासून आवश्यक मर्यादा घालण्‍यात आल्या आहेत. मुंबईतील सर्व बांधकामांसाठी दिलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येत आहेत. नवीन बांधकाम जल जोडणी पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत मंजूर करण्यात येणार नाहीत. सर्व जलतरण तलावांना देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडीत करण्‍यात येत आहेत.

येथे २० टक्के पाणी कपात लागू

जलजोडणीधारकांकडून वाढीव जलजोडणी / अतिरिक्त जलजोडणी करीता अर्ज प्राप्त झाल्यास पुरेसा पाणीसाठी तयार होईपर्यंत मागणी प्रलंबित ठेवण्‍यात येणार आहे. औद्योगिक आणि  व्यापारी तसेच स्पोर्टस् क्लब आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणी कपात लागू करण्‍यात येत आहे. एरीअेटेड वॉटर आणि पॅकेज वॉटर बॉटलिंग प्‍लॅंटला दिलेल्या जलजोडण्यातून होणारा पाणीपुरवठा तेथील कामगारांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेइतका कमी करण्यात (Throttle) येत आहे.

बोअरवेलच्या पाण्याचा वापर

सार्वजनिक स्‍वच्‍छतागृह आणि प्रसाधनगृह सांभाळणाऱ्या संस्थांनी जास्तीत जास्त टँकर- बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा आणि  पिण्याच्या पाण्याची बचत करावी. पिण्याच्या पाण्याच्या वापराव्यतिरिक्त, इतर वापरासाठी विहिरी, कुपनलिका, विधंनविहिरी यांचा जास्तीत जास्त वापर करावा. वाहन धुणे, उद्यानांमधील झाडांना पाणी घालणे, रस्ता- परिसर धुण्यासाठी बोअरवेल अथवा विहिरीच्या पाण्याचा वापर करावा. मध्य रेल्वे / पश्चिम रेल्वे / RCF/ HPCL / BPCL/ Navy / MIDC / BPT आदी आस्थापनांनी दुय्यम वापरासाठी आणि परिचालनासाठी ( Operational use ) कुलाबा तसेच इतर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पातील ( STP ) प्रक्रियायुक्‍त पाण्याचा फेरवापर करावा, असेदेखील परिपत्रकात नमूद करण्‍यात आले आहे.

Follow Us