Breaking : 22 आमदार शिंदे गटाला सोडण्याच्या मनस्थितीत, 9 खासदारही संपर्कात; विनायक राऊत यांनी बॉम्बच टाकला

| Updated on: May 28, 2023 | 2:16 PM

शंभूराजे काय किंवा उदय सामंत काय एक डझन वेळा बोलले की सगळे नेते आमच्या संपर्कात आहेत. हे बोलके पोपट आहेत. त्यांच्या बोलण्याला किंमत नाही. उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय याची पोटदुखी भाजपला आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

Breaking : 22 आमदार शिंदे गटाला सोडण्याच्या मनस्थितीत, 9 खासदारही संपर्कात; विनायक राऊत यांनी बॉम्बच टाकला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : शिंदे गटाचे २२ आमदार वैतागले आहेत. हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत आणि 13 पैकी 9 खासदार आमच्या संपर्कात आहेत. खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. कामं होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:चं बुड स्थावर केलं आहे. इतर कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार या आमदार आणि खासदारांची आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. राऊत यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

शंभूराजे देसाई यांनी पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवलाय होता. आमची इकडे गळचेपी होत आहे, असं शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलंय, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. तानाजी सावंत आणि गजानन कीर्तिकर यांनी असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. तानाजी सावंत यांना बजेट मिळत नाहीये. आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचं ते म्हणत आहेत. भाजपने आता शिंदे गटाला नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची कोंडी झाली आहे, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

फटाक्याची माळ लागणार

शिंदे गटातील आमदारांचा असंतोष उफाळून येतोय. अनेक आमदार आणि मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे संपर्क करायला सुरुवात केली आहे. काहींशी तर प्रत्यक्ष बोलणं सुद्धा झालेलं आहे. त्या लोकांची नावे योग्यवेळी जाहीर करू. लवकरच बॉम्बस्फोट होणार आहे. गजाभाऊंनी काल फटाके फडोले आहेत. त्यांना दट्ट्या मिळाल्यावर ते गप्प बसतील. पण थोडं थांबा फटाक्याची माळच लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शिंदेंना कावीळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नावाची कावीळ झाली आहे. शिंदे गट मोदीभक्त झाला आहे. टीका करण्याखेरीज त्यांना काहीच काम नाही. आरएसएसची स्क्रिप्ट शिंदे वाचतात. भाजपाने सावरकरांचा जयघोष करण्याचा ठेका घेतलेला नाहीये. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांनी सावरकरांची सातत्याने बाजू मांडली आहे. वेळोवेळी भूमिकाही घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं.

सावरकरांना भारतरत्न द्या

आम्हाला जमाल गोटा देण्याचं सोडाच पण तुम्ही रत्नागिरीची सभा घेतली त्या सभेत लोक निघून गेले, तुमचं स्थान काय आहे ते पाहा. हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटावं आणि वीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करून घ्यावं. एकनाथ शिंदे यांची बुद्धीभ्रष्ट झाली आहे. म्हणून त्यांना सगळं पिवळं दिसतंय, अशी टीका ही त्यांनी केली.

मोदींचं कौतुकच आहे

नव्या संसदेची इमारत भव्यदिव्यच आहे. विक्रमी काळात ही इमारत उभी केली. त्याबद्दल मोदी यांचं कौतुकच आहे. पण कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असते तर काय झालं असतं? ही लोकशाहीची अवहेलना आहे, असंही ते म्हणाले.