500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपने राजकीय खळबळ उडवून दिली आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना जरांगे पाटलांचे आंदोलन थांबवण्यासाठी हे पैसे दिल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, "हे 500 कोटी गेले कुठे?" असा प्रश्न विचारत त्यांनी शिंदे-भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी काल एक ऑडिओ क्लिप जाहीर करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडालेली असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हे 500 कोटी रूपये गेले कुठे? कुणाला दिले? कुणी दिले? असा सवाल करतानाच मनोज जरांगे यांचं आंदोलन संपवण्यासाठी हा आरोप केला जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
भाजपवर केलेले आरोप खोटे, एआय जनरेटेड, आमच्यावर आरोप केले जातात तेव्हा ते खरे. हा कुठला न्याय आहे? जरांगे खोटं बोलत आहेत का? क्लिपमधील सर्व लोक भाजपचेच आहेत. ते लोक 500 कोटी रुपये दिल्याचं सांगत आहेत. कुणाला दिले? श्रीकांत शिंदेंना दिले. मनोज जरांगेचं आंदोलन संपवण्यासाठी दिले. का तर मनोज जरांगे मराठवाड्यात भाजपला गिळतील. फोन टेप कोण करतं तर भाजपचे लोक करत आहेत. भाजपकडे ती यंत्रणा आहे. त्यासाठी भाजपने यंत्र आणली आहे. एआय हे आता यायला लागलं आहे. ज्या काळात हे रेकॉर्डिंग झालं, तेव्हा एआयचा एवढा जोर नव्हता, असं संजय राऊत म्हणाले.
ईडीचे डोळे उघडत नाही
श्रीकांत शिंदेंना 500 कोटी दिले. ते कुठे गेले? जरांगे म्हणाले माझ्यापर्यंत आले नाही. मग कुठे गेले? 500 कुठे आले कुठून? त्या 500 कोटीचं काय झालं? हा प्रश्न शाह, फडणवीस आणि शिंदेंना पडला पाहिजे. हा प्रश्न ईडी आणि सीबीआयला पडला पाहिजे. का पडत नाही? काल स्त्रीबीज प्रकरणात ईडीने धाडी मारल्या. 29 लाख रुपये जप्त केले. इथे 500 कोटीचा विषय आहे. ईडीचे डोळे उघडत नाही. ईडीला त्यावर बोलता येत नाही. ईडीला ऐकायला येत नाही. पण 29 लाख रुपयांसाठी राज्यभर धाडी घातल्या, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
जरांगेंना संपवण्याचा डाव
भाजपचे लोक म्हणतात 500 कोटी दिले. याचा आता एसआयटी तपास करणार आहे. काय असते एसआयटी? तुमचाच दांड्या, तुमचाच ढोल. फडणवीस यांनी आतापर्यंत 112 एसआयट्या स्थापन केल्या आहेत. खेळ सुरू आहे का? पूर्वी रेअर केसमध्ये स्थापन केल्या जायच्या. आता उठसूट केल्या जात आहे. त्याला काही राहिलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शिंदे गटाने कसा खेळ केला याचा स्फोट जरांगेंनी केला आहे, असं सांगतानाच जरांगेंना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.
