ठाकरे गटाची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतल्याने वाद, पाहा कुठे घडली घटना

शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. काल रात्री शिंदे गटाने शाखा नुतनीकरणाच्या निमित्ताने बुलडोझरने ही शाखा तोडल्याने दोन गटात आता शाखा ताब्यात घेण्यावरुन हमरीतुमरी माजली आहे.

ठाकरे गटाची शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतल्याने वाद, पाहा कुठे घडली घटना
uddhav thackeray and eknath shinde
Image Credit source: socialmedia
| Updated on: Nov 03, 2023 | 9:08 PM

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : शिवसेनेच्या शाखा मालकीवरुन शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. मुंब्रा येथील संजय नगरातील शंकर मंदिर संकुल ठिकाणच्या शिवसेना मध्यवर्ती कौसा शाखेच्या नुतनीकरणासाठी शिंदे गटाने जुन्या शाखेवर बुलडोझर फिरवित ताबा घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर हरकत घेतली आहे. गेली 20 वर्षे आम्ही टॅक्स भरत आहोत. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तरी देखील शाखा तोडण्याचे काम शिंदे गट करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटांनी केला आहे.

मुंब्रा येथील शिवसेना शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतल्याने ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण झाला आहे. ही शाखा अनेक वर्षे बंद असल्याने तिचे नुतनीकरण गरजेचे असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. नुतनीकरणाच्या निमित्ताने ही शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. ठाकरे गटाचे विजय कदम यांनी याबाबत अनेक पुरावे पोलिसांना दाखवले आहेत. मात्र तरी सुद्धा शाखा तोडण्याचे काम शिंदे गटाचे राजन केणी यांनी केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

शिंदे गटाने केला आरोप

मुंब्रा कौसा मध्यवर्ती शिवसेना शाखा या ठिकाणी शाखेच्या नावाने गैर कारभार सुरू होता. शाखेच्या आजूबाजू परिसर भाड्याने देऊन पैसे कमवण्याचे काम सुरू होते. या शाखेत कुठलेही समाजपयोगी होत नव्हते वा कुठलीही नोंदणी या शाखेत होत नव्हती, या कारणास्तव ही शाखा आम्ही तोडून नव्याने शिवसेना शाखा बांधत आहोत असे माजी नगरसेवक राजन केणी यांनी म्हटले आहे. तर नवीन शाखा बांधून समाज उपयोगी कामे होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाचे म्हणणे

मुंब्रा कौसा प्रभाग समितीला ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणात विचारपूस केली असता त्यांनी ही कारवाई आमच्या आदेशाने झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मध्यवर्ती शिवसेना शाखा कोणाची यावरून वाद होण्याची शक्यता आहे. या शाखेचा कोणताही कमर्शियल वापर किंवा गाळे भाड्याने दिले जात नव्हते असा खुलासा ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच पुढील निर्णय वरिष्ठांना विचारुन घेतला जाईल असे ठाकरे गटाचे विजय कदम यांनी म्हटले आहे.