एसी लोकलला पहिल्याच दिवशी 25 मिनिटं विलंब, ठाणे स्टेशनवर गर्दीचं भयानक दृश्य

| Updated on: Jan 31, 2020 | 12:04 PM

ठाणे रेल्वे स्टेशनवर सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी एसी लोकल येणं अपेक्षित होतं. मात्र ही लोकल पहिल्याच दिवशी तब्बल 25 मिनिटं उशिरा अवतरली.

एसी लोकलला पहिल्याच दिवशी 25 मिनिटं विलंब, ठाणे स्टेशनवर गर्दीचं भयानक दृश्य
Follow us on

मुंबई : मध्य रेल्वेवर एसी लोकलचं थाटामाटात आगमन झालेलं असलं, तरी गर्दीवर उतारा कधी निघणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर नेरुळच्या दिशेने जाणारी एसी लोकल ठाणे रेल्वे स्टेशनवर पहिल्याच दिवशी 25 मिनिटं उशिराने (AC Local Delay on First Day Thane) आली. ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाल्याने चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

मुंबई-ठाण्यातील गर्दीचं भयानक दृश्य दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. ठाणे रेल्वे स्टेशनवर सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी एसी लोकल येणं अपेक्षित होतं. मात्र ही लोकल पहिल्याच दिवशी तब्बल 25 मिनिटं उशिरा अवतरली.

एसी लोकलच्या दररोज 16 फेऱ्या ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्सहार्बर मार्गावर होणार आहेत. या मार्गावरील पहिली एसी लोकल चालवण्याचा मान महिला मोटरमन आणि गार्डला मिळाला आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सीएसएमटी स्टेशनवर आयोजित कार्यक्रमात काल हिरवा झेंडा दाखवला.

ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल एरव्ही 15-15 मिनिटांनी येत असल्यामुळे प्रवाशांची गर्दी उसळत असतेच. त्यात रेल्वेमार्गावर बिघाड झाला, ओव्हरहेड वायर तुटली किंवा रुळाला तडा गेला, की गर्दीचा महासागर लोटतो. उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे आज (शुक्रवार 31 जानेवारी) एसी लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची उत्सुकता लोकलने चांगलीच ताणून धरली.

‘ती येतेय, ती येतेय’ अशी प्रवाशांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. सर्वच प्रवासी वाकून वाकून लोकलची वाट पाहत होते. मात्र 9.19 ची एसी लोकल आली 9 वाजून 45 मिनिटांनी (AC Local Delay on First Day Thane). त्यावेळी प्लॅटफॉर्मवर मुंगीलाही शिरायला जागा नव्हती.

एसी लोकलमध्ये विंडो सीट आणि बसायला जागा असा ‘ऐशोआराम तर’ सोडा, आत शिरण्यासाठीही प्रवाशांना धडपड करावी लागली. त्यात एसी लोकल असल्यामुळे लटकण्याचीही सोय नाही. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने पोलिसांना पाचारण केलं होतं. मात्र ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरणाऱ्या चढणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ, गदारोळ आणि जवळपास चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

दारात लटकताना पडून होणारे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी बंद दरवाजांचा पर्याय शोधण्यात येत आहे. प्रवास गारेगार करण्यासाठी एसी लोकलही पश्चिम आणि मध्य रेल्वेवर येत आहे. मात्र उपनगरी रेल्वे स्थानकांवर वाढती गर्दी रोखण्यासाठी काय करायचं, या प्रश्नावर उत्तर बाकी (AC Local Delay on First Day Thane) आहे.