भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी आता फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

भुलेश्वर येथे २२ फूटी गणपतीची मूर्ती आणताना अपघात होऊन २ जण ठार तर पाच जण जखमी झाले होते. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेने आता मोठ्या आकाराच्या मूर्तींबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी आता फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक
Major decision by the BMC following the Bhuleshwar incident!
| Updated on: Aug 25, 2026 | 9:06 PM

गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. भुलेश्वरमध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर आता एक टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तीसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच गणेश मूर्तीची ऑर्डर दिल्याच्या वेळेपासून ते मूर्ती तयार होऊन मंडळात येईपर्यंतची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.

अवजड गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान अपघातांचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे.  या संदर्भात एक विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी डीएमसी झोन- २ चे अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक आयोजित केली आहे.  या बैठकीत मूर्तीची सुरक्षा, योग्यता प्रमाणपत्रे आणि त्यांच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांना अंतिम रूप दिले जाण्याची शक्यता आहे.

बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्ते विभाग आणि सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना गणेशोत्सवादरम्यान मूर्तीच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी वापरले जाणारे रस्ते खड्डेमुक्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

भुलेश्वरच्या महाराजाला आणताना  मोठी दुर्घटना

भुलेश्वर येथील भुलेश्वरच्या महाराजाला आणताना नुकतीच मोठी दुर्घटना घडली होती. या २२ फूटांच्या भव्य मूर्तीला भायखळा ते भुलेश्वर असे आणताना ही मूर्ती एका बाजूला कोसळल्याने पाच जण जखमी झाले होते.  त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता.  ही घटना मंडपाच्या अवघ्या ५०-६० मीटर आधी घडली आहे. या ठिकाणी रस्त्यावर कोणतेही खड्डे नव्हते. मात्र, मूर्तीचा बोल्ट तुटल्याने ही मूर्ती कोसळल्याचे उघडकीस आले होते.

Follow Us