महिलांपाठोपाठ आता ‘या’ घटकांनाही दिली प्रवासात सवलत, राज्य सरकारचा निर्णय काय ?

दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) या सोबत शाळा, कॉलेजचे ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

महिलांपाठोपाठ आता या घटकांनाही दिली प्रवासात सवलत, राज्य सरकारचा निर्णय काय ?
MUMBAI METRO
Image Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Apr 29, 2023 | 8:32 PM

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत तर महिलांना एसटी बसेसमधून 50 टक्के प्रवास सवलत देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात आता प्रवास करता येणार आहे. सामाजिक भावनेतून आम्ही निर्णय घेतले आहेत. या प्रवास सवलतीमुळे अधिक संख्येने लोक आता प्रवास करतील अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

ही प्रवास सवलत 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता 12 वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या 3 श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) या सोबत शाळा, कॉलेजचे ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

1 मे महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो प्रवासात ही सवलत मिळणार असून 25 टक्के इतकी ही सवलत आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा, सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळेल. सामाजिक भावनेतून हा निर्णय घेतला असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील असे त्यांनी सांगितले.

कोणाला सवलत मिळेल?

मेट्रो लाइन 2 ए आणि 7 च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर ही सवलत मिळू शकेल. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवरदेखील ही सवलत असेल. याला 30 दिवसांची वैधता आहे.