Ajit Pawar : अजित पवार यांची किरीट सोमय्यांना तंबी; मशि‍दीवरील भोंगे काढणार? पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीत ठरलं काय

Loudspeaker on Mosque : मशि‍दींवरील अनधिकृत भोग्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी दादांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना स्पष्ट शब्दात समज दिली.

Ajit Pawar : अजित पवार यांची किरीट सोमय्यांना तंबी; मशि‍दीवरील भोंगे काढणार? पोलीस महासंचालकांसोबतच्या बैठकीत ठरलं काय
दादांची सोमय्यांना तंबी
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 25, 2025 | 10:59 AM

मशि‍दींवरील अनधिकृत भोग्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईसह राज्यातील मशि‍दीवरील भोग्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे. तर वारीस पठाण हे पण या वादात उतरले आहेत. दरम्यान मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात बैठक संपली. त्यावेळी दादांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना स्पष्ट शब्दात समज दिली. काय म्हणाले दादा? काय झाला भोंग्याविषयी निर्णय?

किरीट सोमय्यांना तंबी

अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो असे दादांनी स्पष्ट केले. किरीट सोमय्या हे काही ठिकाणी मशिदीत जात असल्याचे समोर आले होते. मशि‍दीवरील भोंग्यासंदर्भात सोमय्या यांनी यापूर्वी सुद्धा आंदोलन केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सु्द्धा मशि‍दीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात आंदोलनं पेटलं होते. तर काही बॉलिवूड सेलिब्रिटी, गायकांनी सु्द्धा भोंग्यांविरोधात समाज माध्यमांवर मत व्यक्त केलं होतं.

अनाधिकृत भोंग्याविषयी काय कारवाई?

अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती बैठकीला हजर होते. बैठकीत पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उच्च न्यायालयाने घातलेली ४६ ते ५६ डेसिबल आवाज मर्यादा पालन होऊच शकत नाही याच प्रात्याक्षिक दाखवलं. बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाज देखील ४६ डेसिबल पेक्षा जास्त आहे, याचं प्रात्याक्षिक देवेन भारती यांनी अजित पवारांना करून दाखवलं.

अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको असं स्पष्ट शब्दात सांगितलं.

१५०० भोंगे उतरवले

पोलीस आयुक्तांनी माहिती दिली की मुंबईत १५०० भोंगे उतरवण्यात आले आहेत. मुस्लिम संघटनांनी स्पष्टपणे सांगितलं की जर किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करण्यात आली तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल आणि याला किरीट सोमय्या जबाबदार असतील. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी हा मुद्दा तापेल असा राजकीय पंडितांचा व्होरा आहे.

हा वाद जाणूनबुजून

किरीट सोमय्या यांनी जाणूनबुजून हा वाद उपस्थित केला आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. इथे महायुतीचा संबंध येतं नाही. या वादावर तोडगा काढण्याचे सांगण्यात येत आहे. अधिवेशनात आम्ही हा विषय काढणार नाही कारण वेगळं वळण दिलं जातं. अजित दादा मुस्लिमांवर टीका झाली तर मी हक्कासाठी लढेन असे बोलले होते. आता ते काय करत आहेत. सोमय्या मशिदीबाहेर कॅमेरे नेत व्हिडिओ करत आहेत. 1500 भोंगे काढल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराबाबतही असेच आदेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अजानमुळे ध्वनी प्रदूषण होत नाही असे आझमी म्हणाले.

अजितदादांकडे केली तक्रार

मुंबईत मशिदीवरील भोंगे काढायला सांगत आहेत. त्याविषयीची तक्रार आम्ही अजित दादांकडे केली आहे, अशी माहिती एआयएमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी दिली. आमची बाजू ऐकून घ्यावी आणि हे जे सुरू आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काल रात्री मदनपुरा मध्ये पोलीस येऊन दादागिरी करत आहेत. कायदा व्यवस्थित राहावी हीच आमची मागणी आहे. इतक्या वर्षांपासून अजान सुरू आहे. आताच कसा हा प्रश्न निर्माण झाला. याविषयी दादांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांच्या कारवाईवर टीका

तर काँग्रेस नेते नसीम खान यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांना वाटतं की भोंग्यांची परवानगी घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे जे नियम आहेत ते डेसिबल मेंटेन बदल आहे. पोलीस शक्ती प्रदर्शन करत भोंगे काढत आहेत. काही दिवसात भोंगे दिसणार नाहीत. याविषयी आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. पोलिसांना आम्ही मदत करायला तयार आहोत. हा प्रश्न न्यायालयात आहे. संपूर्ण देशात कुठे असे नियम आहेत. गुजरातमध्ये कुठे असे नियम आहेत. किरीट सोमय्या यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी कुठल्याही मस्जिद मध्ये जाणार नाहीत. पोलीस स्थानाकात त्यांनी जाऊन तक्रार करावी, असे खान म्हणाले.