भोजपुरी गाण्यावर डान्स, मुंबईत शिवसेना आमदाराच्या कार्यक्रमावरुन वाद, ठाकरे गटाने शिंदेंना विचारलं, तुम्ही…

Akhil Chitre criticized Prakash Surve : रिक्षा चालकांना मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यावर ललना थिरकल्याने वाद पेटला. मुंबईत शिवसेना आमदाराच्या कार्यक्रमावरून ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

भोजपुरी गाण्यावर डान्स, मुंबईत शिवसेना आमदाराच्या कार्यक्रमावरुन वाद, ठाकरे गटाने शिंदेंना विचारलं, तुम्ही...
अखिल चित्रे, प्रकाश सुर्वे, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 27, 2026 | 10:02 AM

सध्या मुंबईत अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच्या मराठी भाषा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बोरवलीत कोरा केंद्र मैदानावर या निमित्ताने प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे हजर होते. त्यांच्या हस्ते अमराठी रिक्षा चालकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पण या कार्यक्रमात भोजपुरी नृत्यावर डान्स झाल्यानंतर वादाला तोंड फुटले. ठाकरे सेनेचे अखिल चित्रे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी एक ट्विट करत या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतला.

अखिल चित्रे यांची टीका

ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी एक्सवर ट्वीट करत या कार्यक्रमावर तोंडसुख घेतले आहे. “मुंबईच्या बोरीवलीतील एका रंगारंग कार्यक्रमाचा हा व्हिडिओ… व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा… आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय. कार्यक्रमाचा आयोजक कोण? तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे! हा प्रकार आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांच्या विचारांना शोभणारा आहे का?” असा सणसणीत टोला चित्रे यांनी लगावला आहे.

शिंदे सेनेला विचारला सवाल

“आणि अशा रंगेल कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत? महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मिता संपविण्याचा विडाच शहा सेनेने उचलला आहे. मुंबई-महाराष्ट्रातून थैल्या भरून-भरून दिल्लीत बसलेल्या मालकाला द्यायच्या आणि दररोज महाराष्ट्राच्या संस्कृतीला लांच्छन लागेल असं वागायचं. शहा टोळीच्या या रंगेलपणाला कोण खतपाणी घालतंय, हे महाराष्ट्र पाहतोय.” अशी टीका अखिल चित्रे यांनी शिंदे सेनेवर केली आहे. या कार्यक्रमावरून ठाकरे सेनेने शिंदे सेनेला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

Follow Us