जमीन भारताची, बिल्डींग जपानची, अमेरिकन कंपनीने घेतली जागा भाड्याने…, 1000 कोटी भाडे असणारी मुंबईतील इमारत चर्चेत
जेपी मॉर्गनने 1,16,210 वर्ग फूट जागा दहा वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. जे.पी. मॉर्गन या जागेचा वापर कार्यालयासाठी करणार आहे. त्याबदल्यात जपानी कंपनीला भाडे देणार आहे. 10 वर्षांसाठी हा करार आहे.

मुंबईतील रिअल इस्टेट व्यवहारांची चर्चा देशभरात होत असते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जागतिक पातळीवरील कंपन्यांचेही अनेक कार्यालये आहेत. मुंबईतील वांद्रे, कुर्ला कॉम्पलेक्समध्ये (बीकेसी) अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालय आहेत. या परिसरात अमेरिकन कंपनी जे.पी.मॉर्गनने केलेला करार चर्चेत आला आहे. या जागेवर जपानची कंपनी सुमितोमोने तयार केलेल्या एका बिल्डींगमध्ये 1.16 लाख वर्ग फूट जागा दहा वर्षांसाठी अमेरिकन कंपनीने भाड्याने घेतली आहे. या डीलमध्ये भारत-जपान आणि अमेरिका असे तीन देश जोडले गेले आहे. कारण जमीन भारताची, बिल्डींग जपानची आणि भाड्याने घेतले अमेरिकन कंपनीने.
10 वर्षांसाठी हा करार
अमेरिकेतील फायनान्स कंपनी जे.पी.मॉर्गनने बीकेसीमध्ये जागा घेतली आहे. जपानी कंपनी सुमितोमोने बनवलेल्या ऑफिस टॉवरमध्ये ही जागा घेतली आहे. जेपी मॉर्गनने 1,16,210 वर्ग फूट जागा दहा वर्षांसाठी भाड्याने घेतली आहे. जे.पी. मॉर्गन या जागेचा वापर कार्यालयासाठी करणार आहे. त्याबदल्यात जपानी कंपनीला भाडे देणार आहे. 10 वर्षांसाठी हा करार आहे. त्यानंतर जे.पी.मॉर्गन 5-5 वर्षांसाठी हा करार वाढवू शकणार आहे. एकूण करार 25 वर्षांसाठी आहे.
तीन वर्षात भाड्यात 15% वाढ…
करारानुसार, जे.पी.मॉर्गन दर महिन्याला भाडे म्हणून 6.91 कोटी रुपये देणार आहे. तसेच कंपनीने 62.23 कोटी रुपये सुरक्षा अमानतही दिली आहे. प्रत्येक तीन वर्षात भाड्यात 15% वाढ करण्यात आली आहे. 10 वर्षांत जेपी मॉर्गन एकूण 1,000 कोटी रुपये भाडे देणार आहे. कंपनी हा करार 5-5 वर्षांसाठी तीन वेळा वाढवला तर तो 25 वर्षांचा होईल. या कालवाधीत 2,500 कोटींपेक्षा जास्त भाडे जे.पी.मॉर्गन देणार आहे.
जे.पी. मॉर्गन पहिल्या 10 वर्षांसाठी जवळपास 1,000 कोटी रुपये भाडे देणार आहे. त्यानंतर हा करार 25 वर्षांपर्यंत चालला तर भाडे एकूण 2,500 कोटी रुपये होणार आहे. त्यामुळे देशातील रिअल एस्टेट मार्केटमध्ये हा सर्वाधिक महाग करार होणार आहे. हे कार्यालय बीकेसीमधील G ब्लॉकमध्ये 11 आणि 12 व्या मजल्यावर आहे. ही जमीन सुमितोमो रिआलिटी अँड डेव्हलपमेंट कंपनीची भारतीय शाखा गोइसु रिअलिटीने घेतली. या ठिकाणी जे.पी. मॉर्गनचे भारतातील मुख्य कार्यालय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
