आधी पत्र, आता अमित ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, उद्धव ठाकरे म्हणतात…

| Updated on: May 07, 2020 | 8:51 AM

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. (Amit Thackeray Calls CM Uddhav Thackeray to Help MPSC Students stuck in Pune)

आधी पत्र, आता अमित ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, उद्धव ठाकरे म्हणतात...
Follow us on

मुंबई : राज ठाकरे यांचे सुपुत्र, मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अमित ठाकरे यांनी सरकारसमोर मांडला. (Amit Thackeray Calls CM Uddhav Thackeray to Help MPSC Students stuck in Pune)

अमित ठाकरे यांना पुण्यात अडकलेल्या, एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अमित ठाकरे यांनी काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांच्याकडे मांडला.

या विद्यार्थ्यांची तात्काळ आपापल्या घरी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, बसची सोय करण्यात यावी, अशी विनंती अमित ठाकरे यांनी केली. दोन दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अमित ठाकरे यांना दिलं.

मुंबई पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा सर्वांना पुढील चार पाच दिवसात आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत कालच घोषणा केली होती.

हेही वाचा : विद्यार्थी, मजूर ते नातेवाईकांकडे अडकलेले पाहुणे, जिल्ह्यात परतण्यासाठी एसटीची मोफत सेवा

“अमित ठाकरे यांनी पुण्यामध्ये एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाण्याची तात्काळ सोय करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आमच्याशी फोनवरून चर्चा करून आमची विचारपूस केली. आमच्या अडचणीच्या काळात अमित ठाकरे तात्काळ धावून आले. आम्ही सगळे विद्यार्थी त्यांचे आभार मानतो”, असं ट्वीट ‘एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य’ने केलं आहे.

हेही वाचा : पीपीई किट्स घातल्याने दहा तास उपाशी, अमित ठाकरेंकडून ‘मार्ड’च्या डॉक्टरांसाठी उच्च प्रथिनयुक्त आहार

दरम्यान, आम्ही फुकट काम करायला तयार आहोत, पण पदभरतीवर बंदी घालू नका, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीकडून करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे एमपीएससीने राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत.सद्यस्थितीत या परीक्षा कधी होणार याची काहीच स्पष्टता नाही. त्यातच आता राज्य शासनाने पदभरती न करण्याचा निर्णय घेतल्याने शासकीय नोकरीसाठी धडपडणाऱ्या राज्यातील तरुणांचे स्वप्न धोक्यात आहे. एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, पद्माकर होळंबे, जितेंद्र तोरडमल, महेश घरबुडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

आधी पत्र आता फोन

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणारं पत्र रविवारी लिहिलं होतं. “उपचारादरम्यान अनेक नागरिकांना आमच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सर्व रुग्णालयाची माहिती अॅपवर उपलब्ध करावी.” अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली होती.

हेही वाचा : नोकरभरती रद्द नको, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या, रोहित पवारांची मागणी

(Amit Thackeray Calls CM Uddhav Thackeray to Help MPSC Students stuck in Pune)