आता अमृता फडणवीस यांना केंद्रीय मंत्र्यांचीही साथ; गरब्यातील मुस्लिमांच्या एन्ट्रीवरून मोठं विधान

विश्व हिंदू परिषदेने गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याची मागणी केली आहे, तर नितीश राणे यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. या भूमिकेला अमृता फडणवीस यांनी विरोध दर्शवला असून, गरबा सर्वसमावेशक सण असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी फडणवीस यांच्या मताचे समर्थन करत, संविधानानुसार सर्व धर्मांना समान हक्क असल्याचे सांगितले. त्यांनी धार्मिक सलोख्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आता अमृता फडणवीस यांना केंद्रीय मंत्र्यांचीही साथ; गरब्यातील मुस्लिमांच्या एन्ट्रीवरून मोठं विधान
Amruta Fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 6:37 PM

नवरात्र उत्सव काळात गरब्यातील मुस्लिमांच्या एन्ट्रीला बंदी घालावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनीही मुस्लिमांना गरब्यात प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे. त्यावरून देशभर चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस यांनी गरब्यात मुस्लिमांना बंदी करू नये. गरबा हा सर्वसमावेश सण आहे. त्यात सर्वांना सहभाग मिळाला पाहिजे, असं म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समर्थन केलं आहे. आठवले यांनीही गरब्यात मुस्लिमांना बॅन करण्याची भूमिका घेणं योग्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात सर्व धर्मांना न्यायाची वागणूक सुनिश्चित केली आहे. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, लिंगायत, पारशी आणि इतर धर्माचे लोक राहतात. संविधान सर्व धर्मियांचं संरक्षण करतो. त्यामुळे मुस्लिमांनी गरब्यात सहभागी होऊ नये असं म्हणणं योग्य नाही. हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन देशासाठी एकजुटीने काम करण्याची गरज आहे, असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं.

धार्मिक सणात बंदी नकोच

राजस्थानात मोठ्या प्रमाणावर हिंदू अजमेर शरिफच्या दर्ग्यात जातात, याकडेही आठवले यांनी लक्ष वेधलं. आपला असा देश आहे की सर्वच लोक एकमेकांच्या उत्सवात सामील होतात. सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. त्यामुळे एकमेकांना धार्मिक सणात बंदी घालण्याच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतो, असं आठवले म्हणाले.

तोपर्यंत आरक्षण द्या

यावेळी आठवले यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. कमकुवत घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलं जातं. त्यासाठीच हे आरक्षण सुरू करण्यात आलं आहे. जेव्हा देशातील जातीवाद संपुष्टात येईल. तेव्हा आम्ही आरक्षणही सोडून देऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं. जेव्हा 1950मध्ये संविधान लागू झालं, तेव्हा एससी एसटींना आरक्षण दिलं गेलं. तर ओबीसींना 1990 मध्ये आरक्षण दिलं गेलं. तेव्हा व्हीपी सिंह यांचं सरकार होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस काय म्हणाल्या?

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी विहिंपच्या भूमिकेला विरोध केला आहे. मुस्लिम व्यक्तीने उत्सवात सहभागी होणं यात काही वाईट नाहीये, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. अमृता फडणवीस यांच्या या विधानाचं खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं होतं. मी अमृता फडणवीस यांच्या विधानाचं समर्थन करतो. त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. मुस्लिम महिलांना गरब्यामध्ये भाग घेण्याची परवानगी दिली पाहिजे. पण त्यांनी याबाबतचा सल्ला फडणवीस सरकारमधील नव हिंदुत्ववाद्यांनाही दिला पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us