Raj Thackeray: कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो, कमालीचा एकटेपणा घेऊन येतो.. राज ठाकरेंची इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली

| Updated on: Sep 09, 2022 | 6:37 PM

राज ठाकरे लिहितात-जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्षे, युरोपमधील अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाइलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्यामुळे.

Raj Thackeray: कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो, कमालीचा एकटेपणा घेऊन येतो.. राज ठाकरेंची इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली
राज यांची श्रद्धांजली
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – कुठलाही राजमुकुट (Crown)हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्या शिरावरुन हा मुकुट उतरला. एलिझाबेथ द्वितीय यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतयं? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय, हे बघणं कुतुहलाचं असेल. या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी त्यांच्या ट्विटरवर महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth)यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट टाकली आहे. काय लिहिलंय त्या पोस्टमध्ये

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांची श्रद्धांजली

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्षे, युरोपमधील अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाइलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्यामुळे.

ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विस्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर यांच्याशी कितीही खडके उडाले तरी स्वताचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दश: ब्रिटीश राज्यघराण्याचं खासगी आयुष्य ब्रिटीश टॅब्लॉइ्डसनी टव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्या शिरावरुन हा मुकुट उतरला. एलिझाबेथ द्वितीय यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतयं? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय, हे बघणं कुतुहलाचं असेल.

एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मृतीस अभिवादन