मुंबई महापालिकेच्या स्टँडिंगमध्ये कसलं अंडरस्टँडिंग सुरु आहे? आशिष शेलारांचा सवाल

| Updated on: Mar 29, 2020 | 6:00 PM

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची 31 मार्च रोजी बैठक बोलवण्यात आली आहे (Ashish sheklar letter Kishori Pednekar). मात्र, याच बैठकीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई महापालिकेच्या स्टँडिंगमध्ये कसलं अंडरस्टँडिंग सुरु आहे? आशिष शेलारांचा सवाल
Follow us on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची 31 मार्च रोजी बैठक बोलवण्यात आली आहे (Ashish sheklar letter to Kishori Pednekar). मात्र, याच बैठकीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सगळं जग कोरोनाविरोधात लढत असताना मुंबई महापालिकेच्या स्टँडिंगमध्ये कसलं अंडरस्टँडिग सुरु आहे? असा खोचक सवाल त्यांनी ट्विटरवर विचारला आहे. आशिष शेलार यांनी याबाबत मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनादेखील पत्र पाठवले आहे (Ashish sheklar letter to Kishori Pednekar).

“कर्फ्युत मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक का घेतली जाते? एखादा आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्त्वाचा अजेंडा नसताना बैठकीचा अट्टाहास का? आता पुन्हा 31 मार्चला बैठक कशासाठी? सगळं जग कोरोनाच्या विरोधात लढत असताना पालिकेच्या स्टँडिंग मध्ये कसलं अंडरस्टँडिग सुरु आहे?”, असे प्रश्न आशिष शेलार यांनी ट्विटरवर उपस्थित केले.

आशिष शेलार यांनी पत्रात काय म्हटलं आहे?

“मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गेल्या आठवड्यात पार पडली. पुन्हा 31 मार्च रोजी सभा बोलवण्यात आली आहे. यापूर्वी पार पडलेल्या सभेमध्ये एक विषय आरोग्याचा सोडला तर अन्य कोणतेही तातडीचे विषय नव्हते. तरीही सभा घेण्याचा अट्टाहास करण्यात आला. पुन्हा आता 31 मार्चला सभा बोलवण्यात आली आहे. एकीकडे महापालिका यंत्रणेवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड ताण आहे, तर आरोग्याच्या दृष्टीने अशा सर्व शासकीय कामांमध्ये बदल केला असतानाही स्थायी समितीची सभा वारंवार बोलवणे कितपत योग्य आहे?”, असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला.

“विशेषत: सभेचा अजेंडा घेऊन मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सदस्यांच्या घरी जावे लागते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना जीव नाहक धोक्यात का घातला जातो? तसेच नगरसेवकांनाही जास्तीत जास्त वेळ वॉर्ड पातळीवर काम करणे अपेक्षित असून त्यांना अशा पद्धतीने वारंवार बैठकीला बोलावणे योग्य ठरणार नाही”, असं मत आशिष शेलार यांनी मांडलं.

सध्याची परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती आहे असे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असताना आणि कोणत्याही प्रकारचे तातडीचे आणि निकडीचे आणि आरोग्य यंत्रणेचे विषय नसताना वारंवार स्थायी समितीच्या बैठका का घेण्यात येत आहे? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.