अखेर सस्पेन्स संपला! मुंबईचा कारभार आता मेट्रो क्विनच्या हाती; कोण ठरल्या पहिल्या महिला आयुक्त?

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, महापालिकेच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.

अखेर सस्पेन्स संपला! मुंबईचा कारभार आता मेट्रो क्विनच्या हाती; कोण ठरल्या पहिल्या महिला आयुक्त?
BMC
| Updated on: Mar 31, 2026 | 7:36 AM

मुंबईच्या नागरी प्रशासनात मोठा बदल झाला आहे. ‘मेट्रो क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १९९५ बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नव्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी येत्या ३१ मार्चला निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आता अश्विनी भिडे या पदभार स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेच्या इतिहासात आयुक्तपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरणार आहेत.

राजकीय समन्वय आणि नियुक्तीचा प्रवास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेचे नवीन आयुक्त कोण अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाहायला मिळत होती. त्यानंतर या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल चर्चा झाली. या चर्चेनंतर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या पदासाठी असीम गुप्ता आणि संजय मुखर्जी यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र भिडे यांच्या कामाचा धडाका आणि अनुभवामुळे त्यांना प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला त्यांच्या नावासाठी काहीसा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

अश्विनी भिडे यांना तगडा प्रशासकीय अनुभव आहे. गेल्या २४ वर्षांहून अधिक काळ प्रशासनात कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांनी यापूर्वी बीएमसीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. मुंबईतील पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो (मेट्रो-३) प्रकल्पाला कठीण परिस्थितीत मार्गी लावण्याचे श्रेय त्यांना जाते. कडक कार्यशैली आणि ‘डिलिव्हरी ओरिएंटेड’ कामासाठी त्या ओळखल्या जातात.

नव्या आयुक्तांसमोरील आव्हाने

मुंबई महापालिकेची धुरा हाती घेताच अश्विनी भिडे यांच्यासमोर अनेक महत्त्वाची कामे असतील:

१. पावसाळा पूर्व तयारी: मुंबईत पाणी साचू नये यासाठी नालेसफाई आणि पाणी उपसा केंद्रांचे नियोजन.
२. रस्त्यांचे काँक्रिटीकरण: खड्डेमुक्त मुंबईचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करणे.
३. मोठे प्रकल्प: कोस्टल रोड आणि प्रलंबित उड्डाणपुलांच्या कामांना गती देणे.
४. प्रतिमा सुधारणे: पालिकेच्या कारभारावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप मोडून काढून पारदर्शकता आणणे.

दरम्यान राज्यातील सत्ताधारी नेत्यांशी असलेला दांडगा समन्वय आणि मुंबईच्या भौगोलिक समस्यांची जाण यामुळे अश्विनी भिडे यांच्या कार्यकाळात मुंबईच्या नागरी विकासकामांना नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow Us