बिष्णोई गँगशी संबंध, सुपारीचे पैसे, बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी बंदूक कुणी पुरवली?

Baba Siddique Shot Dead in Bandra : राष्ट्रवादी अजित गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली आहे. सहा गोळ्या झाडून बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबतचे महत्वाचे अपडेट्स समोर येत आहेत. बिष्णोई गँगचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर...

बिष्णोई गँगशी संबंध, सुपारीचे पैसे, बाबा सिद्दिकींच्या हत्येसाठी बंदूक कुणी पुरवली?
Baba Siddique
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2024 | 10:18 AM

माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये बाबा सिद्दिकी यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. काल रात्री 9.15 ते 9.20 च्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात झालेल्या गोळीबारामुळे बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अपडेट्स समोर येत आहेत. या हत्या प्रकरणात बिष्णोई गँगचा संबंध असल्याचं समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना तशी माहिती पोलीस तपासात मांडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिष्णोई गँग?

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये दोन्ही आरोपींची चौकशी केली जात आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून आलेल्या तीन शूटर्सने बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दिकींची हत्या करणारे आरोपी हे बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचं आता समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील फरार आरोपी हा मुख्य सूत्रधार असल्याचं इतर दोन आरोपींनी सांगितलं आहे. तिन्ही शूटर्स घटनास्थळी रिक्षाने घटनास्थळी गेले. फरार झालेला आरोपी हा इतर दोन आरोपींना मॉनिटरिंग करत होता.

हत्येआधी कुर्ल्यात राहात होते आरोपी

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सुपारी चार जणांनी घेतली होती. दोन सप्टेंबरपासून आरोपी मुंबईतील कुर्ला भागात भाड्याने राहात होते. 14 हजार भाडं देऊन आरोपी राहात होते. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर तीनही आरोपी प्रत्येकी 50 हजार वाटून घेणार होते. याआधी त्यांना काही अॅडवान्स रक्कमही देण्यात आली होती. आता या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या दोन आरोपींना थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे.