BARC Fake TRP Racket | अडाणी लोकांच्या घरातही इंग्रजी चॅनल, ‘रिपब्लिक’कडून TRP चा खेळ, दोन मालकांना अटक : मुंबई पोलीस

| Updated on: Oct 08, 2020 | 4:44 PM

रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले.

BARC Fake TRP Racket | अडाणी लोकांच्या घरातही इंग्रजी चॅनल, रिपब्लिककडून TRP चा खेळ, दोन मालकांना अटक : मुंबई पोलीस
Follow us on

मुंबई : टेलिव्हिजन चॅनेल्सच्या टीआरपीमध्ये फेरफार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. (BARC Fake TRP racket busted briefed by Mumbai Police Commissioner Param Bir Singh)

परमबीर सिंह यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी करण्यात येईल.

“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी हंसा कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते. या कर्मचाऱ्याकडे 20 लाख रुपयांची रोकड आणि बँकेत साडेआठ लाख रुपये आढळून आले होते. या कर्मचाऱ्याने पोलिसांना या रॅकेटविषयी माहिती दिली. सध्या पोलिसांकडून या सर्वांचा शोध घेतला जात आहे.

टीआरपीत कशाप्रकारे व्हायचे फेरफार?

बीएआरसी BARC या संस्थेकडून टीआरपी मोजला जातो. यासाठी देशभरात जवळपास 30 हजार बॅरोमीटर्स लावण्यात आले आहेत. यापैकी दोन हजार बॅरोमीटर्स हे एकट्या मुंबईत आहेत. हे बॅरोमीटर्स कुठे लावलेत, याची माहिती गोपनीय असायची. हंसा या कंपनीला या बॅरोमीटर्सची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून टीआरपीमध्ये फेरफार करण्याचे रॅकेट चालवण्यात येत होते. हे कर्मचारी विशिष्ट चॅनेल्सना टीआरपीसंबंधी गोपनीय माहिती देत असत, असे परमबीर सिंह यांनी सांगितले.

याशिवाय, एखाद्या चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना दिवसभर आपल्या टीव्हीवर संबंधित चॅनेल सुरु ठेवण्यास सांगितले जाई. यासाठी लोकांना पैसे दिले जात असत. संबंधित चॅनेल सतत सुरु राहिल्याने त्याचा टीआरपी वाढण्यास मदत होत असे, असेही परमबीर सिंह यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार, हक्कभंग दाखल करा, सभागृहात शिवसेना आक्रमक

(BARC Fake TRP racket busted briefed by Mumbai Police Commissioner Param Bir Singh)