Naxalist : माओवाद्यांना मोठा धक्का, जहाल भूपतीसह 60 नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लान

Maoists Surrender before Chief Minister : माओवादी संघटनेला सुरक्षा यंत्रणांनी मोठा धक्का दिला. जहाल भूपतीसह एकूण 60 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत मुख्य प्रवाहात दाखल होण्याचा प्रण केला. हे नक्षलवाद संपवण्याच्या प्रयत्नातील मोठे पाऊल मानण्यात येत आहे.

Naxalist : माओवाद्यांना मोठा धक्का, जहाल भूपतीसह 60 नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लान
देवेंद्र फडणवीस
Updated on: Oct 15, 2025 | 11:52 AM

नक्षलवादी चळवळ देशात अखेरच्या घटका मोजत असतानाच महाराष्ट्रात या चळवळीला जोर का धक्का बसला. जहाल भूपती या नेत्यासह 60 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. हे सर्व नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. त्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि संविधान हाती घेतले आहे. विकासाचा मार्ग हा बंदुकीच्या धाकावर खुला होत नाही तर लोकशाहीतून वृद्धींगत होतो हे त्यांनी मान्य केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षली चळवळीचा इतिहास सांगतानाच पुढील ॲक्शन प्लान ही सांगितला.

नक्षली चळवळीचे कंबरडे मोडले

महाराष्ट्रात गेले 10 वर्षे सातत्याने माओवादाविरुद्ध एक प्रचंड मोठा लढा उभारला. आज त्या लढ्याला निर्णायक यश आले. सोनू ऊर्फ भूपती याच्यासह 61 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या संपूर्ण दंडकारण्यात माओवाद्याचा जो उदय झाला. विशेषतः गडचिरोलीतील अहेरी दलम, सिरोंचा दलम, पेरीमलम दलम, चामोर्शी दलम, टिपा गड दलमच्या माध्यमातून सशस्त्र सेना तयार झाली. याचा बॅकबोन आणि ब्रेन अर्थातच सोनू उर्फ भूपती हा होता. आज त्याच्या आत्मसमर्पणामुळे हा बॅकबोन संपलेला आहे. उत्तर गडचिरोलीतील माओवाद अगोदरच संपलेला होता. आता दक्षिण गडचिरोलीतील माओवाद संपल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. आता फक्त कंपनी 10 याचे बोटावर मोजण्याइतके 8-10 लोकं अजून बाकी आहेत, आम्हाला असा विश्वास आहे की ते सुद्धा आत्मसमर्पण करतील, कारण त्यांच्याकडे कोणताही नेता उरलेला नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तर गडचिरोलीतील माओवाद लवकरच संपणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्च 2026 पूर्वी माओवाद संपवण्याचे जे उद्दिष्ट ठेवलेले होते. त्याच्यापूर्वीच महाराष्ट्राने माओवाद, नक्षलवाद संपवण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा यंत्रणांचे अभिनंदन केले.

प्रोजेक्ट संजीवनी ठरला महत्त्वाचा

गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी नक्षलवाद्यांच्या घाडामोडींवर प्रकाश टाकला. आतापर्यंत 61 माओवाद्यांना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. तर 81 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाल्याची माहिती त्यांनी दिली. उत्तर गडचिरोली माओवादमुक्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आदिवासी सामूहिक विवाह सोहळा होत असल्याचे ते म्हणाले.

आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी 4 रो हाऊस बांधण्यात येईल. जानेवारी 2025 मध्ये भूपतीची पत्नी तरक्काने आत्मसमर्पण केलं होती.चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्याला माओवादाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी दुर्गम स्थळी बससेवा सुरू करण्यात आली आहे. जहाल भूपतीवर 6 कोटींचे बक्षीस होते. आज आत्मसमर्पण करण्यामध्ये 10 डिव्हिजनल कमांडर असल्याची माहिती निलोत्पल यांनी सांगितली. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 61 माओवाद यांच्या आत्मा समर्पण झालेले आहेत. यामध्ये CCM सेंट्रल कोर कमिटी मेंबर भूपती सह अनेक मोठ्या पदावरील माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

माओवादी संघटनेतील पद

CCM -1

DKSZCM -2

DVCM-10

DY Com -1

ACM-06

PPCM-16

PM-25

असे एकूण 61 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.