आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया

| Updated on: Oct 09, 2021 | 10:39 PM

अजित पवारांच्या विरोधातील आयकर विभागाच्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आयकर विभागाने पवार कुटुंबावर छापा टाकला असं बोलणं चुकीचं ठरेल, असं मत फडणवीस यांनी मांडलं आहे.

आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
Follow us on

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या तीन बहिणींच्या घरी तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरु आहे. अजित पवारांच्या 3 बहिणींमध्ये कोल्हापुरातील विजया पाटील, तर पुण्यातील नीता पाटील आणि रजनी इंदूलकर यांचा समावेश आहे. आयकर विभागाच्या या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आयकर विभागाने पवार कुटुंबावर छापा टाकला असं बोलणं चुकीचं ठरेल, असं मत फडणवीस यांनी मांडलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“तक्रारी अशा होत्या की, या कारखान्यांच्या खरेदीच्या वेळी ज्या कंपन्यांमधून पैसा आलाय तो पैसा योग्य नाही. म्हणून याची चौकशी आयकर विभागाने केली. त्यामुळे या कंपन्यांच्या डायरेक्टर्सकडे छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे पवार कुटुंबावर छापा टाकला असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण पवार कुटुंबात अजून लोकं आहेत. ते वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कुठलाही छापा टाकण्यात आलेला नाही. काही चार-पाच साखर कारखाने आहेत, ज्यामध्ये काही व्यवहार झाल्याची माहिती आयकर विभागाला होती. त्याच्या डायरेक्टर्सवर टाकलेले छापे आहे. याला कोणत्याही परिवाराशी जोडून पाहणं हे अयोग्य आहे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

‘1050 कोटींची दलाली, यामध्ये बदल्या, टेंडर, मंत्री आणि अधिकारी’

“आयकर विभागाने दोन प्रकारचे छापे टाकले आहेत. त्यातील पहिल्या छाप्यासंदर्भात त्यांनी प्रेसनोट काढली आहे जी अत्यंत गंभीर आहे. मला असं वाटतं माध्यमांनाही त्याचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. कारण 1050 कोटी रुपयांची दलाली कशाला म्हणतात? कारण त्यामध्ये कागदपत्रे सापडली आहेत. त्याचे पुरावे सापडले आहेत. त्याचे पुरावे सापडले आहेत. यामध्ये बदल्या, टेंडर, मंत्री आणि अधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच नवे तर देशातील सर्वात मोठा पुरावा या छाप्यांमधून सापडला आहे. आता एजन्सी त्या संदर्भात अधिक खुलासा करेल त्याचवेळी त्याबाबत समजेल. पण हे अत्यंत गंभीर आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘तुम्ही काळ्या पैशांवर टॅक्स भरुन ते पैसे पांढरे करु शकत नाहीत’

“अशा प्रकारच्या सगळ्या छाप्यांनंतर पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरुप देणं हे चुकीचं आहे. त्यासोबतच काल-परवा ज्या रेड झाल्या आहेत, पाच साखर कारखाने ज्यांच्या विक्री संदर्भात तक्रार होती ज्याची चौकशी झाली, चौकशीमध्ये विक्रीची प्रक्रियाही चुकीची आहे. त्याहीपेक्षा विकत घेताना जे फंड्स आले आहेत ते चुकीच्या पद्धतीने आले आहेत. तुम्ही काळ्या पैशांवर टॅक्स भरुन किंवा लाचेच्या पैशांवर टॅक्स भरुन ते पैसे पांढरे करु शकत नाहीत हा नियम आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एखादा कारखाना विकत घेता त्यावेळी त्या कारखान्याचा खरेदी पैसा हा योग्य पैसा असला पाहिजे”, असं मत फडणवीसांनी मांडलं.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते बघा :

हेही वाचा : Ajit Pawar IT Raids : अजित पवार, पाहुणे, बहिणी आणि साखर कारखान्यांच्या व्यवहाराचं गौडबंगाल, नेमकं काय आहे? वाचा सविस्तर