सीएएविरोधी संभाषण ऐकून उबर चालक पोलिसात, भाजप आमदाराकडून सत्कार

| Updated on: Feb 08, 2020 | 9:02 PM

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात फोनवर चर्चा करणाऱ्या प्रवासीला एका उबर चालकाने पोलिसांच्या ताब्यात दिलं.

सीएएविरोधी संभाषण ऐकून उबर चालक पोलिसात, भाजप आमदाराकडून सत्कार
Follow us on

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात फोनवर चर्चा करणाऱ्या प्रवाशाला एका उबर चालकाने पोलिसांच्या ताब्यात दिलं. यावरुन भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी कॅब चालकाचा सत्कार करत त्याला ‘सतर्क नागरिक पुरस्कार’ दिला. याबाबत (BJP MLA Mangal Prabhat Lodha) लोढा यांनी ट्विटदेखील केलं.

“नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात षडयंत्र रचणाऱ्या उबर टॅक्सी प्रवाशाला रोहित गौर यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. रोहित गौर यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात बोलवून मुंबईकरांकडून त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना ‘सावध नागरिक पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं”, असं भाजप आमदार लोढा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे (BJP MLA Mangal Prabhat Lodha).

काय आहे नेमकं प्रकरण?

या घटनेबाबत अखिल भारतीय पुरोगामी महिला संघटनेच्या सचिव कविता कृष्णन यांनी ट्विट केलं. यामध्ये त्यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. उबेर चालकाने पोलिसांच्या ताब्यात दिलेला प्रवासी हा राजस्थानचा होता. त्याचे नाव कवी बप्पादित्य सरकार होते, अशी माहिती त्यांनी दिली. दिल्लीच्या शाहीन बागेच्या आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही सीएएविरोधात आंदोलन सुरु आहेत. त्या आंदोलनात प्रवासी सहभागी झाला होता, अशीदेखील माहिती कृष्णन यांनी दिली.

उबर चालक रोहित गौडच्या गाडीत 5 फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास 23 वर्षीय कवी बप्पादित्य सरकार प्रवास करत होता. तो जुहूपासून कुर्ल्याला जात होता. यावेळी तो आपल्या मित्रासोबत फोनवर बोलत होता. त्याच्या संभाषणात दिल्लीच्या शाहीनबागेत सुरु असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनाचा उल्लेख येत होता.

उबेर चालक रोहित गौड प्रवाशाचं संपूर्ण संभाषण ऐकत होता. ते ऐकल्यानंतर रोहितने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि एटीएममधून पैसे घेऊन येतो असं प्रवाशाला सांगितलं. त्यानंतर रोहित आपल्यासोबत दोन पोलिसांना घेऊन आला आणि त्याने प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

“प्रवासी बप्पादित्य सरकार हा कम्युनिस्ट होता आणि तो देशाला पेटवून देण्याची भाषा करत होता”, असा दावा उबेर चालक करत होता. त्यामुळे त्याने प्रवाशाला पोलिसात दिल्याचं सांगितलं.

मात्र, पोलिसांनी सरकारशी विनम्रतेची वागणूक दिली. पोलिसांनी त्याला सोडून दिलं. याशिवाय सोबत ढोलकी आणि मोठा लाल रुमाल न वापरण्याचा सल्ला दिला, अशी माहिती कृष्णन यांनी ट्विटवर दिली.